मालेगाव : दुबार पेरणीचे संकट टळले
नाशिक

मालेगाव : दुबार पेरणीचे संकट टळले

दमदार पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला

Abhay Puntambekar

मालेगाव । प्रतिनिधी Nashik

गत तीन आठवड्यांपासून गुंगारा दिलेल्या पावसाने काल दमदार हजेरी लावल्याने दुबार पेरणीच्या चिंतेने त्रस्त बळीराजास काहीसा दिलासा मिळाला. दाभाडीसह पिंपळगाव, जळगाव, आघार, लखमापूर, कौळाणे, वर्‍हाणे, मेव्हुणे, निमगाव, सोनज, टाकळी, नगाव आदी पट्ट्यात तब्बल एक ते दीड तास झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे उतारावर असलेल्या अनेक शेतांना जवळपास तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. यामुळे काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असले तरी पावसाचे वेळेवर झालेल्या आगमनामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला.

गत दोन-तीन वर्षापासून दुष्काळामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकर्‍यांच्या आशा यंदाच्या खरीप हंगामावर अवलंबून आहेत. त्यामुळे करोना संकटामुळे लॉकडाऊन सुरू असले तरी खरीपासाठी आर्थिक तजवीज कर्ज व उसनवारीव्दारे करून ठेवण्यात आली होती. निसर्ग चक्री वादळामुळे झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांनी खरीप पेरणीची तयारी करून ठेवली होती.

पहिला पाऊस पडताच खरीप पेरण्या शेतकर्‍यांनी पुर्ण केल्या होत्या. मका, बाजरी, भुईमूग, तूर, ज्वारी आदी खरीप पिके घेण्यात आली होती. मका, बाजरी, ज्वारी व भुईमूगला बाजारात चांगली मागणी व भाव असल्यामुळे यंदा या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली होती. आर्थिक सुरक्षितता हा दृष्टीकोन लक्षात ठेवत यंदा शेतकर्‍यांनी खरीप पिकांना प्राधान्य दिले होते. मात्र पेरण्या आटोपताच पावसाने देखील गरज असतांना गुंगारा दिल्याने शेतकरी चिंताक्रांत झाले होते.

तीन आठवड्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला तरी पाऊस येण्याची चिन्हे दिसत नसल्याने व उन्हाची तीव्रता अधिक असल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहण्याची शक्यता असतांना काल दुपारी तीन-साडेतीन वाजेच्या सुमारास मुसळधार पर्जन्यवृष्टीस प्रारंभ झाला. तब्बल एक ते दीड तास झालेल्या या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळून दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला.

काटवनसह अनेक गावांना प्रतिक्षा

काटवन भागातील अजंग, वडेल, वडनेर, खाकुर्डी, विराणे, चिंचवे आदी गावांसह तळवाडे तसेच सावकारवाडी, झाडी, एरंडगाव, अंधारपाडे आदी गावांमध्ये मात्र दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. पिकांची कोळपणी व निंदणी होवून खते देखील देण्यात आली आहेत. मात्र पाऊस नसल्याने शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com