मालेगाव : स्वच्छतेत दिरंगाई केल्यास कारवाई - आयुक्त

मालेगाव :  स्वच्छतेत दिरंगाई केल्यास कारवाई - आयुक्त

मालेगाव । प्रतिनिधी

प्रभाग एक सह संपूर्ण शहरात जंतूनाशक फवारणीसह स्वच्छता मोहिम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रभाग एकमधील अस्वच्छतेसह पाणीपुरवठा वेळेवर न होणे, बंद पथदीप, शौचालयांची दुरवस्था आदी समस्यांची गंभीर दखल आपण घेतली असून लवकरात लवकर या समस्यांचे निवारण केले जाईल. स्वच्छतेच्या कामात दिरंगाई करणार्‍या निरीक्षकांसह स्वच्छता सेवकांविरुद्ध कारवाईचा पवित्रा घेतला जाईल, असे आश्वासन मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी येथे बोलतांना दिले.

मनपा प्रभाग एक कार्यालयात आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली लसीकरण जनजागृतीसह प्रभाग एकमधील पाचही वॉर्डांमध्ये अस्वच्छतेसह विस्कळीत पाणीपुरवठा, बंद पथदीप, रुग्णवाहिकांअभावी रूग्णांचे होत असलेले हाल आदी समस्यांचा एका बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी प्रभाग सभापती कल्पना विनोद वाघ यांनी प्रभाग एक मधील वॉर्डांमध्ये अस्वच्छतेच्या समस्येकडे आयुक्तांचे लक्ष वेधले. जंतूनाशक फवारणी सातत्याने केली जात नाही. तसेच घंटागाडी देखील नियमित येत नसल्याने सर्वच वार्डांमध्ये अस्वच्छतेचे वातावरण पसरले आहे. या संदर्भात स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता सेवकांना विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.

अनेक दिवस स्वच्छता होत नसल्याने सर्वच वार्डांमध्ये कचर्‍याचे साम्राज्य पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अधिकारी, सेवकांमध्ये नियोजनाचा अभाव असल्याने स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे याची त्वरित गंभीरतेने दखल घेत सर्वच वार्डांमध्ये स्वच्छता अभियान राबविले जावे, अशी मागणी सभापती वाघ यांनी करत स्वच्छता विभागाच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली. करोना बाधितांसह इतर गंभीर आजारावरील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध राहत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवित रक्षणासाठी नाशिक येथील एच.ए.एल.यांच्या सीएसआर फंडातून अद्यावत पाच रूग्णवाहिका मनपासाठी उपलब्ध होऊ शकतात.

सदर सीएसआर फंड एचएएलकडे असल्याने यासाठी आयुक्तांसह महापौरांनी पाठपुरावा केल्यास रूग्णवाहिकांची मदत मनपाला होवू शकते. त्यामुळे प्रशासनाने रूग्णवाहिकेसाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी सभापती वाघ यांनी केली. शहरवासियांनी विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच जास्तीतजास्त लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन यावेळी आयुक्त गोसावी यांनी शेवटी बोलतांना केले. बैठकीस उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, उपमहापौर निलेश आहेर, स्थायी समिती सभापती राजाराम जाधव, माजी उपमहापौर सखाराम घोडके, आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे, डॉ. अलका भावसार, नगरसेवक संजय काळे, विजय देवरे, पुष्पा गंगावणे, संजय काळे, युवा सेना जिल्हाप्रमुख विनोद वाघ, प्रकाशआबा अहिरे, अ‍ॅड. गिरीश बोरसे, विवेक वारूळे, दिनेश साबणे, भिमा भडांगे आदी नगरसेवक, मनपा अधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com