मालेगाव: 25.56 कोटी मालमत्ता करवसुली

थकबाकीसाठी जप्तीसह कठोर कारवाई सुरू: आयुक्त
मालेगाव: 25.56 कोटी मालमत्ता करवसुली

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

शहरात मालमत्ता कराची थकबाकी (Property tax arrears) मोठ्या प्रमाणात वाढली असून मार्चअखेर थकबाकी वसुलीच्या (Recovery of arrears) उद्दीष्टपूर्तीसाठी मनपातर्फे नियोजन करण्यात आले आहे. दि. 14 मार्च अखेरपर्यंत सर्व प्रभागनिहाय 15 कोटी 37 लक्ष रुपये घरपट्टी व 10 कोटी 19 लक्ष 33 हजार रुपये पाणीपट्टी (water tax) वसुल करण्यात आल्याची माहिती आयुक्त भालचंद्र गोसावी (Commissioner Bhalchandra Gosavi) यांनी दिली आहे.

शहरात मोठया प्रमाणात थकबाकीदार असून त्यांच्याकडील थकित मालमत्ता करवसुलीसाठी (Property tax recovery) महापालिकेने (Municipal Corporation) कठोर पावले उचलली आहेत. त्यासाठी प्रभागनिहाय 4 वसुली पथके नियुक्त करण्यात आली असून त्यात 46 मनपा अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

आयुक्त गोसावी यांनी काही दिवसांपूर्वी थकबाकी वसुलीबाबत आढावा बैठक (Review meeting) घेवून अधिकार्‍यांना व्यापक मोहीम राबविण्याचे तसेच प्रभाग अधिकार्‍यांना मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करून नियुक्त केलेल्या जप्ती पथकांच्या मदतीने थकबाकी वसुलीबाबत कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

त्या अनुषंगाने दंडासह घरपट्टी (house tax) थकबाकी वसुलीसाठी आयुक्त गोसावी, उपायुक्त राजू खैरनार (Deputy Commissioner Raju Khairnar), सहाय्यक कर आयुक्त हेमलता डगळे (Assistant Tax Commissioner Hemalatha Dagle), सहाय्यक प्रशासन आयुक्त सचिन महाले, सहाय्यक आयुक्त तथा गृहकर अधीक्षक अनिल पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 14 मार्चरोजी प्रभाग क्रमांक 1 च्या कार्यक्षेत्रातील भायगाव-1 वार्डात प्रभाग अधिकारी जगदीश बडगुजर,

जप्ती अधिकारी जयपाल त्रिभुवन, वार्ड लिपीक पुंडलिक ढोणे, सहाय्यक संजय ठाकूर, सचिन रावेरकर, अमित पगारे आदिंनी कलंकार इलेक्ट्रीकल्स् (29,448 रुपये थकित घरपट्टी), सत्यजित सुरेश पाटील व दिनेश कारभारी हिरे (53,050 रुपये थकित घरपट्टी), ज्ञानेश उत्तमराव मोरे (39,089 रुपये थकित घरपट्टी) यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई केली. तसेच दि. 12 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रभागनिहाय एकूण 5,290 पैकी 305 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून 82,71,496 रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली.

मनपा आयुक्तांनी थकित मालमत्ता कर वसुलीसाठी अधिकारी व कर्मचार्‍यांनाही कारवाईचा इशारा देत कर वसुलीच्या उद्दीष्टपुर्तीसाठी मार्च अखेरपर्यंत अधिकारी-कर्मचार्‍यांच्या सर्व सुट्ट्या व रजा रद्द केल्या आहेत. दोन वर्ष करोना संसर्गामुळे थकबाकीचे प्रमाण वाढले असून एकत्रित वसुली करतांना प्रशासनाची देखील दमछाक होत आहे. मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी वसुली पथकाने गेल्या दोन आठवड्यात 16 मालमत्ता सील केल्या असून अडीच कोटींची वसुली केली आहे.

प्रभाग अधिकार्‍यांनी प्रभागनिहाय मोठ्या थकबाकीदारांच्या याद्या तयार केल्या आहेत. त्यांच्याकडे वसुलीसाठी पाठपुरावा केला जात आहे. आगामी काळात थकबाकी वसुलीसाठी मालमत्ता जप्तीबरोबरच नळजोडण्या खंडीत करण्याची कारवाई देखील केली जाणार असल्याने शहरातील मालमत्ताधारकांनी थकित कराची रक्कम भरून, जप्तीसारखा कटू प्रसंग टाळावा व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त गोसावी यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com