संविधान विषय अनिवार्य करा
नाशिक

संविधान विषय अनिवार्य करा

अध्यापक भारतीची मागणी

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

* देशहितासाठी मागणीचा विचार करावा

येवला । प्रतिनिधी

राष्ट्रीय शाळा-महाविद्यालय, विद्यापीठ स्तरावर संविधान विषय अनिवार्य करण्यात यावे, सी.बी. एस.सी व एन.सी.आर.टी.ने आपल्या भारतीय संविधानिक विचार मूल्यांना अभ्यासक्रमातून डावलण्याचे कारस्थान थांबवावे, अशी मागणी अध्यापक भारतीच्या वतीने केंद्र व राज्य सरकार व संबंधित अभ्यासक्रम मंडळाला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

अध्यापक भारतीने सन 2015 पासून सुरू केलेल्या संविधान साक्षरता अभियानाअंतर्गत भारतीय संविधान शाळा-महाविद्यालय, विद्यापीठ स्तरावर संविधान विषय अनिवार्य करण्यात यावा, अशी भूमिका सातत्याने मांडली आहे.

प्राथमिक स्तरापासून ते विद्यापीठ स्तरापर्यंत कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांसह अन्य सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमात भारतीय संविधान हा विषय अनिवार्य करावा, असा ठराव अध्यापकभारतीने आयोजित केलेल्या पहिल्या अखिल भारतीय विद्यार्थी-पालक-शिक्षक साहित्य संमेलनातून ठराव करून सरकारला दोन वर्षांपूर्वी पाठवला आहे.

देशातील विद्यार्थ्यांना संविधान विषयाची प्राथमिक माहिती तोंडओळख करून देण्यात यावी, मात्र वयोगट व शैक्षणिक स्तराप्रमाने संविधान विषय अध्ययन, अध्यापनात अर्थात अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, अशी मागणी अध्यापकभारतीचे संस्थापक शरद शेजवळ यांनी केली आहे.

भारतीय संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना समजेल, तसेच सुजाण नागरिक म्हणून संविधानातील हक्क व कर्तव्याची जाण पुढील पिढीला व्हावी, असा उद्देश ह्या मागणीचा असून भारतीयांचा धर्मग्रंथ असलेला भारतीय संविधान हा ग्रंथ असून त्याचा अभ्यास हा उद्याचे आदर्श नागरिक व सुसंस्कृत समाज व राष्ट्र उभे करेल, असा विश्वास ह्या अभ्यासातून निश्चितच निर्माण होईल, असे मत पत्रकात नोंदवले आहे.

देशहितासाठी या मागणीचा गांभीर्याने विचार करण्यात यावा, अशी विनंतीही या पत्रात करण्यात आली आहे. सी. बी. एस. सी व एन.सी.आर.टी. भारतीय संविधानाच्या उद्देशीकेतील अनेक महत्त्वपूर्ण मूल्य विचार डावलून राजकीय दबावातून भारतीय शिक्षणपद्धतीने सुनिश्चित केलेल्या गाभा घटक व संविधानिक विचार-मूल्यघटकानाच अभ्यासक्रमातून हद्दपार करत असून अभ्यासक्रमाची वाटचाल शिक्षणाच्या धार्मिकीकरणाकडे करत असून देशाच्या एकता, एकात्मता, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन, बंधुता, समता, स्वातंत्र्य, न्याय मूल्यांना डावलत आहे. ते त्वरित थांबवून भारतीय संविधानिक मूल्यांचा सन्मान करावा, असे आवाहन अध्यापकभारतीने पत्रकाद्वारे केले आहे.

पत्रकावर शरद शेजवळ, संतोष बुरंगे, मिलिंद पगारे, शैलेंद्र वाघ, प्रा. अमित बनकर, अरुण दोंदे, मिलिंद गुंजाळ, प्रा.मिलिंद गांगुर्डे, महेंद्र गायकवाड, विनोद पानसरे,सिद्धार्थ पवार, प्रा. सुवर्णा पगारे, कामिनी केवट, वनिता सरोदे, भारती बागुल, अतुल डांगळे, दीपक शिंदे, सचिन शिराळ, ईश्वर गांगुर्डे यांच्या सह्या आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com