दिवाळीत करा एसटीतून ‘कॅशलेस’ प्रवास

दिवाळीत करा एसटीतून ‘कॅशलेस’ प्रवास

नाशिक । Nashik

यंदाच्या दिवाळीत प्रवाशांना एसटीमधून कॅशलेस प्रवास करता येणार आहे.

11 ते 22 नोव्हेंबर या काळात प्रवाशांसाठी जादा गाड्या सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. महामंडळाचे प्रवासात सवलती देणारे स्मार्ट कार्ड देखील दिवाळीच्या मुहुर्तावर सुरू करण्यात येणार आहे.

हे कार्ड बस स्थानकाऐवजी खासगी कंपनीतील एजंटकडे उपलब्ध होईल.

दिवाळीनिमित्त सुट्ट्या आणि हिवाळ्यात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवासी बाहेर पडतात. या काळात एसटी गाड्यांसाठीची मागणी वाढते. त्यामुळेच या काळात नियमित गाड्यांच्या व्यतिरिक्त यंदा 1000 जादा गाड्या चालवण्यात येतील, असे समजते.

केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमानुसार एसटीत कॅशलेस प्रवास सुरू करण्यासाठी ओटीसी (ओव्हर द काऊंटर) स्मार्ट कार्ड दिवाळीच्या मुहुर्तावर सुरू करण्यात येईल. या कार्डमध्ये ट्रॅव्हल वॉलेट आणि शॉपिंग वॉलेट यांचा समावेश असणार आहे.

हे कार्ड घेण्यासाठी खासगी एजंटकडे नाव आणि मोबाइल क्रमांक नोंदवणे आवश्यक असणार आहे. कार्ड रिचार्जसाठी या खासगी एजंटकडे संपर्क साधावा, असे महामंडळाने काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

सार्वजनिक सुट्ट्यामुळे राज्यात 11 ते 16 नोव्हेंबरदरम्यान अधिकाधिक प्रवासी एसटी प्रवासाला प्राधान्य देतील, अशी अटकळ आहे. 17 ते 22 नोव्हेंबर दरम्यान या प्रवाशांचा तसेच पर्यटकांचा परतीचा प्रवास सुरू होईल.

लक्ष्मी पूजन, पाडवा अशा मुहूर्तावर गावी पोहोचणार्‍या गाड्या त्या ठिकाणी मुक्कामी राहतील व दुसर्‍या दिवशी प्रवाशांना प्रवासासाठी गाड्या मिळतील, अशी व्यवस्था करण्यात यावी, असे आदेश वाहतूक विभागाने दिले आहेत.

करोनामुळे थांबलेल्या तब्बल 7000 एसटी गाड्या राज्यात जोमाने प्रवासी वाहतूक करत आहेत. सध्या 8 लाख प्रवाशांचा या गाड्यांतून दररोजचा प्रवास सुरू आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com