माझी वसुंधरा : विभागीय आयुक्त गमे यांचा सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव

विभागाला 23 पुरस्कार
माझी वसुंधरा : विभागीय आयुक्त गमे यांचा सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव

नाशिक । प्रतिनिधी Nashik

वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून समृद्ध पर्यावरण निर्माण करण्यासाठी माझी वसुंधरा अभियान 2.0 ( Majhi Vasundhara Abhiyan ) हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवण्यात येत आहे. या उपक्रमात नाशिक विभागाला तब्बल 23 पुरस्कार मिळाले असून या स्पर्धेमध्ये नाशिक विभागाची कामगिरी सर्वोत्तम झाली असल्याने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे ( Divisional Commissioner Radhakrishna Game) व त्यांच्या टीमचा पर्यावरणदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray )यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

नाशिक विभागाने माझी वसुंधरा अभियान 2.0 यशस्वी केले आहे. या स्पर्धेत 82 पुरस्कारांपैकी नाशिक विभागाला एकूण 23 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये राज्यात माझी वसुंधरा अभियानाची सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणार्‍या नाशिक विभागाचा गौरव करण्यात आला.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन टाटा थिएटर (एनसीपीए), मुंबई येथे करण्यात आले होते. समृद्ध पर्यावरण निर्माण करण्यासाठी माझी वसुंधरा अभियान 2.0 हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवण्यात येत आहे.

याअंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या स्थानिक संस्था, विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकार्‍यांचा सन्मान जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण व वातावरणीय बदलमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जर्‍हाड, सदस्य सचिव अशोक शिनगारे आदी उपस्थित होते.

अहमदनगर जिल्ह्याला बारा पुरस्कार

माझी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये कर्जत नगरपंचायतीचा नगरपंचायत गटात प्रथम क्रमांक तसेच भूमी या विशेष घटकातही विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला. नगरपंचायत गटात शिर्डी नगरपंचायतीचा सन्मान करण्यात आला असून अकोले नगरपंचायतीला विभागीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अहमदनगर महानगरपालिकेला ‘उंच उडी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला असून संगमनेर नगरपरिषदेला तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भूमी घटकासाठी काम करणार्‍या मिरजगाव ग्रामपंचायतीला सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आले. सोनई ग्रामपंचायतीला विभागीय स्तरावरील प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील वाघोली, गणोरे व मढी ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उपक्रमाची चांगली अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर व आशिष येरेकर यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

नाशिक जिल्ह्याला सहा पुरस्कार

माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणार्‍या नाशिकचे तत्कालीन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीस राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला असून निफाड तालुक्यातीलच चांदोरी ग्रामपंचायतीचा तृतीय क्रमाकांचे पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. इगतपुरी तालुक्यातील शिरसाटे ग्रामपंचायतीला पृथ्वी या घटकासाठी राज्यस्तरीय व विभागस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

धुळे जिल्ह्याचा सन्मान

माझी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये धुळे महानगरपालिकेला विभागीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जळगाव जिल्ह्याला तीन पुरस्कार

माझी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी नगरपंचायतीला नगरपंचायत गटात राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच माझी वसुंधरा अभियानात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजित राऊत व माझी वसुंधरा उपक्रमाची चांगली अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांना विभागीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com