मका विक्रीचे पैसे त्वरित मिळावे

मका विक्रीचे पैसे त्वरित मिळावे

प्रहार संघटनेने घेतली खासदारांची भेट

येवला । प्रतिनिधी Yevla

शासकीय मका खरेदीची रक्कम दोन महिने उलटूनही अद्याप शेतकर्‍यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झालेली नाही, याबाबत प्रहार संघटनेच्या शिष्टमंडळाने खासदार डॉ. भारती पवार यांची भेट घेत माहिती दिली.

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने, या मराठीतील म्हणीप्रमाणे करोनामुळे अगोदरच उशिरा म्हणजे २७ मेला सुरू झालेली खरेदी संथगतीने सुरू झाली. त्यात शासकीय अधिकारी, सेवक यांच्या मोघम व कार्यालयात बसून काम करण्याच्या वृत्तीमुळे दोन वेळा कोठा वाढ व तीन वेळेस मुदतवाढ मिळविण्यात बराच कालापव्यय झाला. यामुळे शेतकर्‍यांना ऐन हंगामात शेतीची कामे सोडून खरेदी केंद्रावर अडकून राहिल्याने खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

आज घेतलेल्या माहितीनुसार नोंदणी झालेल्या शेतकर्‍यांपैकी मोजके शेतकरी राहिले असून येवला तालुक्यातील आजवर १५ हजार ९५१ क्विंटल मका खरेदी झालेली आहे. परंतु शासनाने खरेदी केलेल्या मकाचे सुरवातीचे नऊ दिवसाचे पैसे शेतकर्‍यांना अदा करून चार जून नंतर मका विक्री केलेल्या उर्वरित शेतकर्‍यांना अद्याप पैसे न दिल्याने ऐन हंगामात भांडवलासाठी दाही दिशा करण्याची वेळ या शेतकर्‍यांवर आणली आहे.

एकीकडे साठवून ठेवलेला कांदा खराब हवामानामुळे सडत आहे. तो कांदा बाजारात आणावा तर बाजारात ४०० ते ६०० रुपये प्रतीक्विंटल दराने या कांद्याचे लिलाव होत आहे. त्यातून चालु हंगामासाठी भांडवल उभे करणे शक्य होईना. या बाबत आज खासदार डॉ. पवार यांची भेट घेऊन मक्याचे पैसे तत्काळ मिळावे, कांदा निर्यातीस प्रोत्साहन देऊन निर्यातीस वा शेतकर्‍यांना थेट अनुदान देण्यात यावे, कधी नव्हे ती युरिया खताची टंचाई होत असून राखीव कोठा खुला करण्यात यावा, या व इतर मागण्या मांडून, चर्चा करून खासदार डॉ. पवार यांना निवेदन देण्यात आले.

शिष्टमंडळात प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, चांदवड तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, येवला तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, कार्याध्यक्ष रामभाऊ नाईकवाडे आदी सहभागी झाले होते.

Deshdoot
www.deshdoot.com