महाविकास आघाडी मदतीसाठी मैदानात तर भाजप आंदोलनात

महापालिकेतील 'सत्ते'चा डोस निष्प्रभ : लाॅकडाऊनबाबतही गोंधळ
महाविकास आघाडी मदतीसाठी मैदानात तर भाजप आंदोलनात

नाशिक । कुंदन राजपूत

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष नाशिक शहरात कोव्हीड सेंटर व रक्तदान शिबिरातून करोना संकटात मदतीसाठि मैदानात उतरले असताना भाजप मात्र, आंदोलनासाठीच जोर बैठका काढत असल्याचे विरोधाभासी चित्र पहायला मिळत आहे.

महापालिकेतील 'सत्ते'चा डोस सोबत असूनही मदत कार्याच्या बाबतीत भाजप नगरसेवक व तिन्ही आमदार पिछाडीवर असल्याचे चित्र असून लाॅकडाऊन बाबतही युटर्न घेण्याची नामुष्कि महापौरांवर अोढवल्याने भाजप गोंधळलेल्या अवस्थेत दिसून येत आहे.

करोना अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत नाशिक देशात अव्वल असून परिस्थिती हाताबाहेर जात आहे. मृत्युदर वाढल्याने स्मशानभुमीत चौवीस तास चिता पेटत आहे. मात्र या संकटातही राजकारण जोरात असून महाविकास आघाडी विरुध्द भाजप असा संघर्ष स्थानिक पातळीवरही दिसून येत आहे.

मागील वर्षभरात शहर भाजपने वाढिव वीज बिल, मंदिरे खुली करा यांसह भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर जोरदार आंदोलने करत महाविकास आघाडीविरुध्द उठसूठ तोफांना बत्ती दिली. आता करोनाच्या दुसर्‍या लाटेने कहर केले असताना महाविकास आघाडीचे नेते मदतीसाठी मैदानात उतरले आहे.

शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी कोव्हीड सेंटर सुरु केले. माजी महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी आॅक्सिजन बॅक तयार केली. पालकमंत्री भुजबळ यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीने तीनशे बेडचे सुसज्ज कोव्हीड सेंटर उभारले. तर काॅग्रसेने रक्तादान शिबिर आयोजीत करत मदतीचा हात दिला. हे तिन्ही पक्ष मदतीसाठी मैदानात उतरले असताना आंदोलनासाठी जोर बैठका काढणारा भाजप मदतीच्या बाबतीत निष्क्रिय दिसत आहे. महापालिकेत एकहाती सत्ता व शहरात तीन आमदार असूनही मदत कार्यात भाजप स्वत:ची छाप पाडण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

काही प्रभागांमध्ये भाजप नगरसेवक त्यांच्यापरीने मदत करत असले तरी पक्ष म्हणून भाजप भरीव मदत कार्य उभारण्यात अपयशी ठरल्याची चर्चा आहे. लाॅकडाऊनच्या बाबतीतही महापौर सतिष कुलकर्णी व भाजप आमदारांनी अगोदर विरोध दर्शवला. पण नंतर पलटी घेत लाॅकडाऊन लावावा अशा मागणीचे पत्र महापौेर कुलकर्णी यांनी पालकमंत्री भुजबळ यांना लिहिले. भाजप आमदारांनिही भुजबळ यांच्याकडे लाॅकडाऊनची मागणी केली. एकूणच आंदोलनात जोर दाखवणारी भाजप करोना संकटात मदतीबाबत गोंधळलेल्या स्थितीत असल्याचे पहायला मिळत आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता असून करोना संकटाशी लढण्यासाठि उपाय योजना आम्ही करत आहोत. लाॅकडाऊनला आमचा विरोध नव्हता. मात्र, मागील वर्षी जसा कडक लाॅकडाऊन होता तसा लागू करावा ही आमची भूमिका होती. महाविकास आघाडिचे नेतेच गोंधळलेले आहेत.

- गिरिश पालवे, शहराध्यक्ष, भाजप

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com