महाराणा प्रताप चौक प्रतिबंधित
नाशिक

महाराणा प्रताप चौक प्रतिबंधित

लोकप्रतिनिधी-अधिकार्‍यांच्या बैठकीत निर्णय

Abhay Puntambekar

नवीन नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराणा प्रताप चौक येथे करोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आज शनिवारपासून पुढील १४ दिवस प्रतिबंधित क्षेत्र म्हणून बंद करण्यात येणार असल्याचे प्रभागाचे नगरसेवक व मनपा अधिकार्‍यांच्या बैठकीत ठरवण्यात आले.

प्रभाग २४ येथील महाराणा प्रताप चौक, बडदेनगर, वंदे मातरम् चौक, गणेश चौक, महात्मा फुले चौक, हरेश्वर मंदिर परिसर या परिसरात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने हा परिसर हॉटस्पॉट बनला आहे. या परिसरात भाजीमार्केट असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते. कोणत्याही प्रकारच्या सामाजिक अंतराचे पालन होत नाही. त्यामुळे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. यात महाराणा प्रताप चौक भागातील मुख्य रस्ता सोडून चौक परिसरात करोना रुग्ण वाढत असल्याचे समोर आले आहे

ही बाब लक्षात घेऊन करोनाची साखळी तोडण्यासाठी खुटवडनगरप्रमाणेच संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करावा यासंदर्भात नगरसेवक राजेंद्र महाले यांच्या संपर्क कार्यालयात बैठक पार पडली होती. या बैठकीदरम्यान अत्यावश्यक सेवा सोडून आजपासून पुढील १४ दिवस राणाप्रताप चौक ते स्टेट बँकेकडे जाणारा रस्ता संपूर्ण बंद करण्यात येणार असून मुख्य रस्ता हनुमान मंदिर ते महात्मा फुले चौकापर्यंत एका बाजूने बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीप्रसंगी नगरसेवक राजेंद्र महाले, नगरसेविका कल्पना पांडे, कल्पना चुंबळे, यांच्यासह मनपाचे दशरथ भवर, ए. जे. काजी, तसेच मोरवाडी रुग्णालयातील आरोग्य अधिकारी डॉ. दीपिका मोरे यांच्यासह आरोग्य विभागाचे सेवक उपस्थित होते.

यावेळी आरोग्य विभागाने सर्वे केलेला अहवाल मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सादर केला होता. यात हा परिसर बंद ठेवण्याचे नमूद करण्यात आले. आता परिसरातील नागरिकांनी करोनाची साखळी तोडण्यासाठी सामाजिक अंतराचे नियम पाळावे, मास्क वापरावा व महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेवकांनी केले आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com