सटाणा । प्रतिनिधी Satana

देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त पहाटे 4 वाजता शहरातील मंदिरात महापूजा संपन्न झाली. गेल्या 134 वर्षात प्रथमच करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यात्रोत्सव व रथ मिरवणूक रद्द करण्यात आल्याने तालुकावासियांमध्ये निरूत्साहाचे वातावरण पसरले आहे. यात्रोत्सव भरणार नसल्याचा मोठा आर्थिक फटका बसणार असल्याने व्यापारी वर्गामध्ये देखील निराशा दिसून येत आहे.

देवमामलेदार मंदिरात बागलाणचे तहसीलदार शुभम गुप्ता, ईशा जैन, नगराध्यक्ष सुनिल मोरे, योगिता मोरे, देवस्थान अध्यक्ष भालचंद्र बागड, अरूणा बागड, विश्वस्त हेमंत सोनवणे, लता सोनवणे आदींच्या हस्ते देवमामलेदारांच्या मुर्तीवर अभिषेक करीत महापूजा करण्यात आली. तसेच सकाळी 11 वाजता येथील न्यायमुर्ती विक्रम आव्हाड व संगीता आव्हाड यांच्या हस्ते देवमामलेदारांची महाआरती संपन्न झाली. यावेळी सुरक्षित अंतराचे नियम पाळत भाविक मंदिरात उपस्थित होते.

महापूजेच्या पार्श्वभूमीवर हॉटेल नंदन, साई कृषी सेवा तसेच स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांना पेढे वाटप करण्यात आले. देवमामलेदार यशवंतराव महाराज मित्रमंडळाच्या वतीने साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. खामखेडा, ता. देवळा येथील वारकरी संप्रदाय व ग्रामस्थांतर्फे सुभाष बिरारी यांच्या नेतृत्वाखाली लायकेश्वर खामखेडापासून शहरात पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले. दुपारी देवमामलेदार रथाला पोलिसांसह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ओढण्यात येवून छोटेखानी रथयात्रा संपन्न झाली.

बागलाण तहसील कार्यालयात देवमामलेदार यशवंत महाराजांच्या ऐतिहासिक खुर्चीचे तहसीलदार शुभम गुप्ता व ईशा जैन यांनी पुजन केले. तसेच पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या यशवंतराव महाराजांच्या मंदिरात पहाटे 4 वाजेच्या सुमारास पोलीस नाईक अजय महाजन, स्वाती महाजन, किशोर कदम, भारती कदम यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. करोना संसर्गामुळे दरवर्षी असलेली गर्दी यावेळी कमी असली तरी दिवसभर भाविकांनी सुरक्षिततेचे नियम पाळून देवमामलेदारांचे दर्शन घेतले.