मनमाड । Manmad (बब्बू शेख)

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसह भाजीबाजारात देखील कांद्या पाठोपाठ आता सर्वच भाजीपाल्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे.

कोथिंबीर, मेथी, शेपू व पालक आदी पालेभाज्यांचे भाव तर अक्षरश: कवडीमोल झाले असल्याने कापणीचा खर्च देखील निघणार नसल्याने संतप्त शेतकर्यांनी कोथिंबीर, शेपू व पालक आदी पालेभाज्यांच्या शेतात जनावरे चरण्यासाठी सोडून दिली आहेत.

बाजारात भाव मिळेल, या आशेवर पालेभाज्या घेऊन आलेल्या शेतकर्यांना कोथिंबीर, पालक, शेपूच्या जुडीचे एक अन् दोन रुपये भाव मिळू लागल्याने त्यांनी हा भाजीपाला फेकून देत समितीतून काढता पाय घेतल्याचे निराशाजनक चित्र दिसून आले. कोथिंबीरची जुडी एक रुपया तर पालक, शेपूच्या तीन जुड्यांना दहा रुपयेदेखील भाव मिळत नाही.

पेरणी व कापणीसाठी झालेला खर्च निघत नसल्याची व्यथा शेतकर्यांनी व्यक्त केली. दमदार पाऊस झाल्याने धरण, शेततळेच नव्हे तर विहिरीदेखील तुडुंब भरल्या असल्याने शेतकर्यांनी भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. यंदा सर्वच भाजीपाल्यांची आवक वाढली आहे.

आवक वाढताच भावात मोठी घसरण सुरू झाली. सर्वात जास्त फटका कोथिंबीर आणि मेथी, शेपू, पालक या भाज्यांना बसत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकर्यांनी शेतात जनावरे चरण्यास सोडून देण्याचा निर्णय घेतला. मात्र महागाईने त्रस्त जनतेला भाजीपाला स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.