नांदूरमध्यमेश्वर
नांदूरमध्यमेश्वर
नाशिक

नांदूरमध्यमेश्वरला कमळपुष्पाचा ताज

अडीच हजार कमळाची फुले उमलली

Gokul Pawar

Gokul Pawar

निफाड । Niphad

राज्यात रामसर आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवणारे नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या जलाशयात दीड एकराच्या परिसरात जवळपास अडीच हजार कमळाची फुले उमलली असून चापडगाव टॉवर जवळच्या आसपास रामबाण, पानलीली, पानशेवाळ, अर्ली आदींसह सुमारे 40 वनस्पती फुलांनी बहरल्या आहेत.

करोना प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून पर्यटकांसाठी नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य बंद ठेवण्यात आले आहे. साधारण पावसाळ्याच्या प्रारंभी धरणातील जलाशयात कमळ फुलतांना दिसतात. त्यातच यावर्षी गंगापूर, दारणा धरणातून सातत्याने पाणी सोडले गेल्याने जलाशय टिकून राहिला. त्याचा फायदा यावर्षी कमळाची फुले मोठ्या संख्येने बहरण्यावर झाला. गोड्या व उथळ पाण्यावर ही वनस्पती प्रामुख्याने आढळून येते. संचारबंदीमुळे पर्यटक येणे बंद झाले तर बंदोबस्तामुळे मच्छिमारांची संख्या घटली.

तर गेल्या महिन्यात कमळ बेटाभोवती बांबू व संरक्षक तार लावून हा परिसर बंदिस्त केल्याने रानडुकरांचा त्रास कमी झाला. जलस्तर टिकून राहिल्याने कमळ चांगला फुलला. स्थानिक नागरिकांनी देखील या जलवनस्पतींच्या संवर्धनासाठी हातभार लावला. एरव्ही पर्यटकांची वर्दळ अन् पक्षांच्या किलबिलाटामुळे लक्ष वेधून घेणारा हा परिसर रिमझिम पाऊस आणि नयनरम्य पाणथळामुळे अधिकच रम्य वाटू लागला आहे.

जणू निसर्गानेच या पाणथळाला कमलपुष्पाचा साज चढविला असून या जलाशयाला सौंदर्याचे कोंदण लाभले आहे. सध्या करोना प्रादुर्भावामुळे हा परिसर पर्यटकांसाठी बंद केला असल्याने कमळाची उमललेली फुले पाहण्यावर विरजण पडले आहे.

अभयारण्यात कमळ पक्ष्यांचे वास्तव्य

यावर्षी जलाशयात पाणी टिकून राहिल्याने कमळ फूल उमलण्यास मोठा हातभार लागला आहे. तसेच जखाना (कमळ पक्षी) पक्ष्याचे आवडते खाद्य म्हणजे कमळाचे फूल.त्यामुळे यंदा अभयारण्याच्या परिसरात हे पक्षी मोठ्या संख्येने दिसत असून हे पक्षी येथेच राहिल्यास पक्षीप्रेमींनाही हजारो जखाना (कमळ पक्षी) पहावयास मिळतील. - गंगाधर आघाव, पक्षीमित्र

येथील पक्षी अभयारण्यात पाणथळ व दलदलीच्या परिसरात 536 वनस्पती असून 10 ते 15 वनस्पती फुलतात. सध्या येथे कमळाची फुले मोठ्या प्रमाणात उमलली आहे. ही फुले पाहण्यासाठी पक्षी अभयारण्य उघडण्याची वाट पहावी लागणार आहे. प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर अभयारण्य खुले होणार आहे.

-अशोक काळे, वनपाल, नांदूरमध्यमेश्वर

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com