जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तक्रारींचा पाऊस

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तक्रारींचा पाऊस

नाशिक । प्रतिनिधी Nashik

प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर कार्यारंभ आदेश वेळेत मिळत नसल्याने हा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ( Zilla Parishad General Meeting ) उपस्थित करत सदस्यांनी सेवक फाईली अडवत असल्याचा आरोप केला.

सदस्य किंवा ठेकेदार जेव्हा कार्यारंभ आदेश घ्यायला जाईल तेव्हाच फाईल काढली जाते. याबरोबरच फाईली गायब होतात, अशा अनेक तक्रारींचा पाऊस सदस्यांनी पाडत प्रशासनाला धारेवर धरले. फाईलींना विलंब लावणार्‍या संबंधितांचे एक वेतन कपात करण्याचा ठरावही सदस्यांनी केला.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली दीड वर्षानंतर बुधवारी सर्वसाधारण सभा झाली. व्यासपीठावर उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, सभापती संजय बनकर, सुशीला मेंगाळ व आश्विनी आहेर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे उपस्थित होते.

भाजप गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी कामांच्या प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर कार्यारंभ दिले जात नसल्याचा विषय उपस्थित केला.

यात संबंधित सेवक फाईली दडवतात किंवा फाईलीच लंपास करतात. ठेकेदार किंवा सदस्य टेबलावर गेल्याशिवाय कार्यारंभ आदेशाची फाईली काढत नसल्याच्या तक्रारी सदस्यांनी केल्या.यात काही सेवक फाईली अडवित असल्याचा आरोप सदस्यांनी यावेळी केला.

सात वर्षांपासून कामांची फाईल गायब असल्याचे भास्कर गावित यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. एकाच टेबलावर ठाण मांडून असलेल्या ठराविक सेवकांकडून हे प्रकार होत असल्याचे सदस्यांनी सांगितले. निविदा प्रसिध्द करणे असो की, निविदा उघडणे यातही सेवक अडवणूक करत असल्याचे सदस्यांनी सांगितले. दर सोमवारी आढावा बैठकीत कसला आढावा होतो? असा मुद्दा उपस्थित करत मनिषा पवार यांनी प्रशासनाला खडेबोल सुनाविले.

अखेर संतप्त झालेल्या सदस्यांनी फाईली अडविणार्‍या सेवकांवर कारवाई करण्यासाठी त्यांची एक वेतनवाढ रोखावी असा ठराव केला. त्यास सभागृहाने अनुमोदन दिले. या चर्चेत सिमंतिनी कोकाटे, दीपक शिरसाठ, उदय जाधव, नयना गावित, सिध्दार्थ वनारसे, यशवंत शिरसाठ, गीताजंली पवार-गोळे, जे. डी. हिरे आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

उल्लू बनवू नका

भाजपचे सदस्य जे. डी. हिरे यांनी मालेगाव तालुक्यातील निमगाव ग्रामपंचायतीतील कार्यवाहीबद्दल प्रश्न उपस्थित करत नऊ महिने होऊनही कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर अहवाल प्राप्त झाला नसल्याचे उत्तर प्रशासनाने दिल्यानंतर, हिरे संतप्त झाले. प्रशासनाकडून कार्यवाहीस टाळटाळ केली जात असल्याचा आरोप करत केवळ उल्लू बनविले जाते, आम्हाला वेडयात काढायला येथे बोलविले जाते का ? असा सवाल उपस्थित करत मुख्यालयाच्या प्रवेशव्दारावर उपोषणाचा इशारा देत माझ्यावरून गाडी चालवा अशा संतप्त भावना व्यक्त केल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com