चोरट्यांचा लुटीचा प्रयत्न फसला; सोनाराला जबर मारहाण

चोरट्यांचा लुटीचा प्रयत्न फसला; सोनाराला जबर मारहाण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

श्रमिकनगर (Shramiknagar) येथील सराफ व्यावसायिकाला पाठलाग करत गाडी अडवून अज्ञात चोरट्यांनी जबर मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली. याबाबत अज्ञात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सातपूरमधील (Satpur) श्रमीकनगर येथील गंगासागरनगरमध्ये (Gangasagarnagar) असलेल्या स्वामी हाईट्स या बिल्डिंग मधील श्री यमाई माता ज्वेलर्सचे संचालक महेश दिलीप टाक (सोनार) (Mahesh Tak) (रा. निर्मिती लाईफ प्लेस, वृंदावन गार्डन जवळ) दुकानाची आवरसावर करून शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दुकानापासून जवळच असलेल्या आपल्या घरी दुचाकीने निघाले होते.

दरम्यान, थोडे पुढे गेल्यानंतर कोणी आसपास नसल्याचा गैरफायदा घेऊन पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चौघांनी महेश यास अडविले आणि गळ्यात असलेली बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला.

या प्रकाराला महेशने विरोध केला. विरोध केल्याचा राग डोक्यात धरून चौघा संशयितांनी फावडे आणि कोयत्याने हातावर, डोक्यावर, मानेवर जबर मारहाण करुन त्यांना गंभीर जखमी केले.

त्यानंतर महेश यांची बॅग घेऊन पसार झाले. या बॅगमध्ये केवळ चेकबुक आणि बँकेचे पासबुक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महेश टाक यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत सातपूर पोलिसांनी चौघा अज्ञात चोरट्यांचा विरोधात भादवी 394, 331, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील (Satish Patil) पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com