
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राजस्थान येथे नुकत्याच झालेल्या पाली येथील अठराव्या राष्ट्रीय स्काऊट गाईड जांबोरीत देशभरातून विविध राज्यातील ३६,१४२ स्काऊट गाईड विद्यार्थी व स्काऊट गाईड शिक्षक सहभागी झाले होते....
जांबोरीत विविध राज्यांना आपापल्या संस्कृतीवर आधारित, राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यात मानाची समजल्या जाणाऱ्या स्पर्धांपैकी एक लोकनृत्य या विभागातील राष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या सविता ताडगे यांनी दिग्दर्शित केलेल्या पावणे तीनशे विद्यार्थ्यांच्या "महाराष्ट्राची लोकधारा" हे नृत्य " अ" श्रेणी राखत देशात जांबोरित सर्वोत्कृष्ट ठरले.
आदिवासी सेवा समिती, नाशिक संचलित समाजश्री डॉ. प्रशांतदादा हिरे माध्यमिक विद्यालय अशोकनगर सातपुर या विद्यालयात सविता ताडगे या उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
या नृत्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील २८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात नाशिक, पुणे, सांगली, सातारा, बारामती, नंदुरबार, अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश होता. सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सविता ताडगे यांनी महाराष्ट्राची लोकधारा या स्पर्धेची तयारी करण्यासाठी वैयक्तिकरित्या त्या त्या जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन दिग्दर्शन केले आणि या नृत्याची अंतिम रंगीत तालीम राजस्थान येथील पाली येथे यशस्वीरित्या करण्यात आली.
महाराष्ट्राची लोकधारा या नृत्यांमध्ये महाराष्ट्र राज्याची वैभवशाली संस्कृती दर्शवणारे अनेक नृत्य प्रकार जसे लावणी, कोळी नृत्य, गोंधळी नृत्य, धनगर नृत्य, पोवाडा वारकरी आदी प्रकारांचा अत्यंत कल्पक समावेश त्यांनी केला होता.
महाराष्ट्राची लोकधारा नृत्याचे सादरीकरण १२० फूट बाय १२० फूट आकाराच्या भव्य स्टेजवर अत्यंत दिमाखात जोशात सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव नृत्य अविष्कारातून देशभरातून आलेल्या ३६ हजार विद्यार्थी, शिक्षक, आयोजकांचे व परीक्षकांचे मने जिंकत राजस्थानचा आसमंत भगवामय झाला.
या कार्यास प्रवीण पाटील (जि. प. शिक्षणाधिकारी, माध्यमिक), फुलारे (जि. प. प्राथमिक विभाग), महाराष्ट्र स्काऊट गाईड राज्य कार्यालयाच्या किशोरी शिरकर (गाईड राज्य प्रशिक्षक), राज्य सेक्रेटरी अरुण सपताळे, फुलपगारे, श्रीधर कोठावदे, नाशिक स्काऊट गाईड कार्यालयाचे राजेंद्र महिरे स्काऊट जिल्हा संघटक, हेमांगी पाटील, (गाईड जिल्हा संघटक) यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.