नाशिक। Nashik

'आता पाच रुपये कशासाठी द्यायचे त्यापेक्षा सरळ लॉकडाऊन करा ते बर राहील', अशी प्रतिक्रिया मनपाकडून सुरु करण्यात आलेल्या तिकीटविक्री संदर्भात नाशिककरांनी दिली.

दरम्यान कालपासून बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी जाणार्या प्रत्येकाकडून पाच रुपये प्रति व्यक्तीप्रमाणे प्रवेश शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे आज दिवसभर पाच रुपयांवरून नागरिकांचा गोंधळ उडाला. काही नागरिकांना याबाबत कल्पनाच नव्हती, अनेकांनी पैसे देण्यावरून बाचाबाची केली. यामुळे नागरिकांमध्ये या उपक्रमावरून नाराजी व्यक्त करण्यात आली.

शहरातील मुख्य बाजारपेठांसह विविध उपनगरांमधील बाजारांमध्ये पोलीस व मनपा प्रशासनाकडून राबविण्यास सुरुवात झाली. दुपारनंरत शालिमार येथून यास सुरूवात झाली. मेनरोड, शिवाजीरोड येथील मुख्य बाजारपेठेकडे जाणारे महत्वाचे रस्ते पोलिसांनी बॅरिकेडिंग करत बंद केले होते.

या भागात प्रवेश करणार्या प्रत्येकाला पाच रुपयांची पावती मनपा कर्मचार्यांकडून दिली होती. परंतु व्यापारी वर्गाचा यास विरोध असून अशाने ग्राहक वर्ग कमी झाला आहे. त्यापेक्षा सरसकट लॉकडाऊन करा, असे मत शालिमार येथील व्यावसायिकाने व्यक्त केले.

दरम्यान शहर तसेच जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून त्यास आवर घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविधप्रकारचे निर्बंध जारी केले आहेत. मात्र बहूतांश नागरिकांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. किमान बाजार पेठेत विनाकारण फिरणारांना चाप बसण्यासाठी पोलीस व मनपा प्रशासनाने खरेदीसाठी वेळमर्यादा अनी प्रवेश शुल्क वसुली शक्कल लढवली आहे.