शहरी भागात करोना नियंत्रणात लॉकडाऊनचे चांगले परिणाम
नाशिकचा संग्रहित फोटो

शहरी भागात करोना नियंत्रणात लॉकडाऊनचे चांगले परिणाम

नाशिक | प्रतिनिधी

लॉकडाऊन झाल्यापासून शहरी भागातील रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र ग्रामीण भागात अद्यापही रुग्णवाढ होतांना दिसत आहे त्यामुळे सर्व यंत्रणांनी रुग्णसंख्या कमी कशी होईल त्यादृष्टीने काटेकोर नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत...

आज येवला विश्रामगृह येथे येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना व लसीकरण याबाबत आढावा बैठक पार पडली, त्यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते.

ते म्हणाले, ऑक्सिजनची कमतरता होऊ नये यासाठी ऑक्सिजनचा आवश्यक साठा रुग्णालयात ठेवण्यात यावा. डॉक्टर तसेच इतर कर्मचारी मनुष्यबळाची कमतरता असलेल्या केंद्रांवर तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे.

बंद असलेले व्हेंटिलेटर तातडीने सुरू करण्यात यावेत. ड्युरा आणि जम्बो सिलेंडरची आवश्यकता असल्यास आपली मागणी कळविण्यात येऊन उपलब्ध ते करून घेण्यात यावेत.

शहरात प्रत्येक वार्डात नगरसेवकांनी तसेच स्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन तपासणी मोहीमेस सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करताना पालकमंत्री भुजबळ म्हणाले, गृहविलीगिकरण यशस्वी रित्या पार पाडावे.

त्याचबरोबर लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी सर्वांनी आता आपापली जबाबदारी लक्षात अथक प्रयत्न करावेत.

यावेळी येवला नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, प्रांत अधिकारी सोपान कासार, डॉ. अर्चना पठारे, जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, तहसीलदार प्रमोद हिले, तहसीलदार शरद घोरपडे,

येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ. शैलजा कृपास्वामी, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शरद कातकाडे, बीडीओ डॉ. उन्मेष देशमुख, संदीप कराड, ग्रामीण पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, वसंत पवार, दीपक लोणारी, ज्ञानेश्वर शेवाळे, सुनील पैठणकर, मकरंद सोनवणे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com