साडेतीन हजार रुग्णांना जीवदान

जिल्हा रुग्णालयात लॉकडाऊन काळात इतर शस्त्रक्रिया
साडेतीन हजार रुग्णांना जीवदान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात करोनाचा मोठा उद्रेक सुरू असून जिल्हा रुग्णालयासह सर्व आरोग्य यंत्रणा करोनाशी दोन हात करण्यात व्यस्त आहे. असे असतानाही इतर गंभीर आजाराच्या रुग्णांकडे दुर्लक्ष न करता लॉकडाऊनपासून आतापर्यंत ३ हजार ५७९ शस्त्रक्रिया करत त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी केला आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह राज्यभरात २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला आहे. तेव्हापासून संसर्ग टाळण्यासाठी बहुतांश रुग्णालयांनी शस्त्रक्रिया लांबणीवर टाकल्या होत्या. करोनाशी लढा देण्याची तयारी यासाठी जिल्हा रुग्णालयही सज्ज करण्यात येत असल्याने अति तातडीच्या वगळता इतर शस्त्रक्रिया लांबवणीवर टाकण्यात आल्या होत्या. परंतु संपूर्ण जिल्ह्यातून जिल्हा रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात गरीब रुग्ण अवलंबून आहेत. त्यांना इतरत्र शस्त्रक्रियांचा खर्च पेलवत नसल्याने जिल्हा रुग्णालयाशिवाय पर्याय राहिला नव्हता. अशा रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना करोनाच्या काळातही जिल्हा रुग्णालयाने मोठा दिलासा दिला.

प्रामुख्याने अपघात, यात झालेल्या इतर अवयवांना जखमा तसेच मोडलेल्या हाडांच्या शस्त्रक्रिया, धारदार शस्त्राने झालेले हल्ले, सेप्टिक, सिझर बाळंतपणे, हार्निया, तसेच अस्थिरोग यासह इतर सर्व प्रकारच्या अत्यावश्यक शस्त्रक्रिया यामध्ये करून अशा रुग्णांना जीवदान देण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात मार्च ते जून या चार महिन्यांच्या लॉकडॉऊन कालावधीत गंभीर स्वरूपाच्या ६२० शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यातील सर्वाधिक ३७७ शस्त्रक्रिया मार्च महिन्यात झाल्या. यानंतर मात्र त्यांचे प्रमाण कमी होत मे महिन्यात ६९ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कमी जोखमीच्या २ हजार ९५९ शस्त्रक्रिया या कालावधीत करण्यात आल्या.

यात १ हजार २३९ या मार्च महिन्यातील आहेत. यातील १ हजार १९२ रुग्णांना उपचारांनतर घरी सोडण्यात आले आहे. तर अद्याप ७३७ शस्त्रक्रिया झालेले रुग्ण उपचार घेत आहेत. करोनाचा धोका असतानाही रुग्णांसाठी धोका पत्करत वैद्यकीय अधिकारी तसेच सेवकांंनी यशस्वीपणे या शस्त्रक्रिया पार पाडून साडेतीन हजार पेक्षाही अधिक रुग्णांना जीवदान दिले आहे.

एकीकडे करोनाला तोंड देण्यासाठी आमची संपूर्ण आरोग्य यंत्रणा कार्यरत होती. तर दुसरीकडे सर्वसामान्य रुग्णांचा बाह्यरुग्ण तपासणी विभाग, रुग्णालयात दाखल रुग्णांवर उपचार व तातडीच्या शस्त्रक्रिया सर्वच आघाड्यांवर आमच्या पथकांनी काम सुरू ठेवले होते. प्रत्येक रुग्णाची शस्त्रक्रिया केल्यानंतर करोनापासून त्याची अधिक काळजी घेतली जाते. तसेच संशयित वाटल्यास त्याचे तातडीने स्वॅब पाठवणे तसेच तो पॉझिटिव्ह आल्यास संपूर्ण शस्त्रक्रिया विभाग पूर्णपणे निर्जंतूक करून पुढील शस्त्रक्रिया आम्हाला कराव्या लागल्या. परंतु रुग्णसेवेला सर्वांनी महत्त्व देत काम केले.

डॉ. निखिल सैंदाणे,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com