दिवाळीचा आनंद वाटून घेऊया..!

दिवाळीचा आनंद वाटून घेऊया..!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाच्या काळात दिवाळीचा सण आपण सगळे साजरा करत आहोत. हा सण आनंद आणि उत्साह घेऊन आला आहे. दिव्यांचा हा सण कोणता संदेश देतो यावर नाशिकमधील काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया

आनंद वाटून घ्या!

माझ्यासाठी या दिवाळीचा आनंद म्हणजे गरजूंना मदतीचा हात देणे, त्यांना दिवाळीचा फराळ वाटणे आणि अर्थातच स्वत: ला फटाक्यांपासून दूर ठेवणे. माझे विशेषत: विद्यार्थ्यांना आवाहन अशा प्रकारच्या साथीच्या परिस्थितीत ते गरजुंना दिवाळीच्या फराळाचे वाटप करू शकतात. सात महिन्यापासून आपण सगळे स्क्रीनचा जास्त वापर करत आहोत. या सणाच्या निमित्ताने आपण स्वतःला कॉम्प्यूटर, लॅपटॉप, टीव्ही, मोबाईलपासून दूरठेऊ शकतो. दिवाळीच्या तयारीसाठी घरी मदत करून सर्वांचा दिवाळीचा आनंद करू शकतो.

सचिन उषा विलास जोशी, शिक्षण कार्यकर्ते

एकत्रिततेचे बंध वाढवू या!

उत्सवांमध्ये सर्वानी एकत्र येणे हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहेअशा प्रत्येक लहान-मोठ्या प्रसंगी जेव्हा आपण आपले मित्र, कुटुंब आणि शेजारी यांच्यासोबत एकत्र येतो आणि दिवाळीसारखे सण साजरे करतो तेव्हा सणाचा आनंद आणि मजा वाढते. या दिवाळीत आपण एकत्रिततेचे बंध वाढवू या!

निशितताल, संचालक, एबीएच डेव्हलपर

आरोग्यासाठी अन्न

दिवाळीत फराळ आणि मिठाईची रेलचेल असते. मिठाईवर ताव मारण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेतल्यास तुमची दिवाळी नक्कीच निरोगी असेल. रोज सकाळी 1 चमचा खोबरेल तेल किंवा 1 चमचा चांगले तूप गरम पाण्यात टाकून प्या. थोडे खा. दिवसभर भरपूर पाणी प्या आणि अर्थातच व्यायाम करा. निरोगी ठेवण्यासाठी राहण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.

रश्मी गौरव सोमानी, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट

नवी आशा; नवी सुरुवात

हिवाळा आला की झाडे आपली जुनी पाने फेकतात आणि नव्या पालवीचे स्वागत करतात. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे जो आपल्याला सकारात्मकतेने जगण्याची प्रेरणा देतो. दिवाळीमुळे दररोज नवीन आनंद मिळतो. दिवाळीत प्रज्वलित केलेले दिवे आपल्याला आपल्यामध्ये अहंकार, दुःख आणि संताप कायमचा दूर करण्याचा आणि नवीन गोष्टी स्वीकारण्याचा संदेश देतात.

निलेश तसकर , शेतकरी

धैर्य आणि संयम

प्रत्येक दिवाळी माझ्यासाठी नेहमीच काहीतरी नवीन आणि खास आणते, जलतरणाच्या क्षेत्रात नवीन कामगिरी किंवा नवीन लक्ष्य माझ्यासमोर ठेवते. परंतु यावर्षी कोरोना महामारीमुळे कोणतीही नवीन मोहिम सुरु नाही. ही दिवाळी आम्हाला खेळाडूंना अशा वेळी शांत आणि संयमशील राहण्यास शिकवते.

प्रसाद अविनाश खैरनार; एनआयएस जलतरण प्रशिक्षक, नाशिक

लालित्यपूर्ण दिवाळी

दिवाळीचा सण लालित्यपूर्ण आहे. दिवे, रोषणाई रांगोळी, मिठाई, पोशाख या सर्व गोष्टी उत्साह आणतात. महामारीची परिस्थिती असली तरी लोक दिवाळी साजरी करण्यासाठी उत्साही आणि उत्सुक आहेत. बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत आणि प्रत्येकजण खरेदी करीत आहे. आणि सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे शोधत आहेत. सण साजरा करा आणि आनंदी व्हा

श्रुती भुतडा, ड्रेस डिझायनर

संगीताची उर्जा : दिवाळी

आपल्या भारतीय संस्कृतीत कोणताही सण संगीताशिवाय पूर्ण होत नाही आणि दिवाळीत वेगळीच उर्जा असते. दरवर्षी दिवाळीत आपल्याकडे अनेक संगीतमय कार्यक्रम होतात. पण यावर्षी आम्ही डिजिटल मिडियाचा वापर करून सर्व सण साजरे करत आहोत. आमचे पारंपारिक अभंग आणि भक्तीगीते जगभरातील चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही विविध पाश्चात्य वाद्यांचाही उपयोग करतो. सगळे सण संगीतमय करण्यासाठी सर्जनशील मार्ग शोधत असतो.

राहुल आंबेकर, एमएच 15 बँड, नाशिक

घर म्हणजे आनंद

माझ्या पालकांची आणि माझी गेल्या वर्षी पाच ते सहा वेळा भेट झाली. पण यावर्षी आम्ही दहा महिन्यांनी भेटलो. ही दिवाळी माझ्यासाठी अधिक खास आहे कारण मी घरी बनविलेले जेवण जेवणार आहे. ज्यांच्यावर मी सर्वात जास्त प्रेम करतो त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करणार आहे. घरत प्रवेश करताच मी माझ्या कुटुंबियांना घट्ट मिठी मारली. मी त्यांना किती मिस करत होतो पण आता मी त्यांच्याबरोबर आहे आणि आम्ही एकत्र दिवाळी साजरी करणार आहोत.

जयवंत तारामकर, एनडीए विद्यार्थी

दिवाळी काळजीपूर्वक साजरी करा!

दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडताना लोकांनी मास्क घालून सामाजिक अंतर राखले पाहिजे. आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. खरेदीसाठी बाहेर जाताना सॅनिटायझर जवळ बाळगणे आणि त्याचा वापर करणे आवश्यक आहे. लोकांनी फटाके फोडणे टाळावे. प्रदूषण रोखण्यासाठी यावर्षी मातीचे दिवे लावून आणि फटाके न लावता दिवाळी साजरी करावी.

डॉ.सागर केळकर

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com