कांदा उत्पादकांच्या हक्काचा लढा सुरूच ठेऊ- राजेंद्र भोसले

फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांचे पैसे मिळवण्यात यश
कांदा उत्पादकांच्या हक्काचा लढा सुरूच ठेऊ- राजेंद्र भोसले

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शेतात घाम गाळत काबाडकष्ट करणार्‍या कांदा उत्पादक शेतकर्‍यांची ( Onion Growers ) फसवणूक झाल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी संघर्ष उभा केला. घंटानाद, बिर्‍हाड मोर्चा, ठिय्या व पर्दाफाश आंदोलन व बैलगाडी मोर्चाद्वारे सतत चार वर्षे शेतकर्‍यांच्या पैशांसाठी प्रामाणिकपणे संघर्ष केल्यानेच 14 शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळू शकले. कांदा उत्पादकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा राष्ट्रवादीतर्फे ( NCP )अधिक मजबुतीने लढला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र भोसले यांनी येथे बोलताना दिली.

येथील मराठा दरबार सभागृहात मुंगसे केंद्रावर ( Mungse Center )फसवणूक झालेल्या 14 कांदा उत्पादक शेतकर्‍यांना बाजार समितीतर्फे थकित रकमेचे वाटप केले गेले. यावेळी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना राजेंद्र भोसले बोलत होते. व्यासपीठावर मविप्र अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, माजी सभापती प्रसाद हिरे, डॉ. जयंत पवार, प्रदेश सचिव दिनेश ठाकरे, तालुकाध्यक्ष संदीप पवार, डॉ. राजेंद्र ठाकरे, धर्मा भामरे, विनोद शेलार, नंदू सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते समितीने दिलेल्या रकमेचे वाटप कांदा उत्पादक शेतकर्‍यांना करण्यात आले.

या देशात फसवणूक करण्यासाठी शेतकरीच लक्ष्य केले जात आहेत. कुणीही यावे आणि शेतकर्‍यांना लुटून न्यावे असेच घडत आहे. काबाडकष्ट करत कांदा पिकवत तो विकणार्‍यांनाच खोटे ठरवले गेले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या सन्मानार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मैदानात उतरावे लागले. आंदोलन प्रामाणिकपणे केले जात असल्याने शेतकर्‍यांनीदेखील विश्वास ठेवला. त्यामुळे या आंदोलनाला यश येऊन कांदा उत्पादकांना त्यांचे हक्काचे पैसे मिळू शकल्याचे भोसले यांनी बोलताना स्पष्ट केले.

झिरो बजेट शेती व हरित क्रांतीचे स्वप्न दाखवणारे कधीही शेतात पाय ठेवत नाहीत. दिल्लीच्या तक्तावरून डाळीस 10 हजार रुपये भाव देण्याचे सांगितले गेल्याने शेतकर्‍यांनी विक्रमी प्रमाणात डाळींचे उत्पादन घेतले. मात्र भाव दिला गेला नाही. अशा ढोंगी लोकांपासून शेतकर्‍यांनी सावध राहण्याची गरज असल्याचे भोसले यांनी बोलताना सांगितले.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी सभापती प्रसाद हिरे यांनी कांदा उत्पादकांचे पैसे समितीने दिले नाहीत तर महसूल विभागास हे पैसे द्यावे लागतील. यासंदर्भात न्यायालयात रिकव्हरीसाठी दाद मागावी लागेल. समितीतील गैरप्रकारांना विरोध केल्यामुळेच आपल्यावर अविश्वास आणला गेला. कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

समितीच्या गैरकारभाराविरुद्ध सुरू केलेले आंदोलन कांदा उत्पादकांनी साथ दिल्यामुळेच यशस्वी होऊ शकले. विक्री केलेल्या कांद्याचे पैसे मिळाले नसल्याचे प्रतिज्ञापत्र देणार्‍या सर्व कांदा उत्पादकांना त्यांची थकित रक्कम मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहणार आहे. त्यासाठी गरज पडल्यास न्यायालयात अथवा मंत्रालयातसुद्धा दाद मागणार असल्याचे प्रदेश सचिव दिनेश ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

मुंगसे केंद्रावर कांदा विक्री केलेल्या 681 शेतकर्‍यांची व्यापार्‍यासह बाजार समितीतर्फे फसवणूक करण्यात आली होती. यासंदर्भात पैसे मिळाले नसल्याचे 151 शेतकर्‍यांनी प्रतिज्ञापत्रदेखील सादर केले आहे. मात्र बाजार समितीतर्फे हात झटकण्यात येऊन शेतकर्‍यांनाच खोटे ठरवले गेले. त्यामुळे हे आंदोलन उभे करावे लागले. घंटानाद, बैलगाडी मोर्चा, बिर्‍हाड, ठिय्या व पर्दाफाश आंदोलन छेडण्यात आल्याने या आंदोलनाची दखल खा. शरद पवार व पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतल्यामुळेच चौकशी समिती नेमण्यात आली.

चौकशीअंती शेतकर्‍यांना पैसे मिळाले नसल्याचे स्पष्ट झाल्याने उपनिबंधकांनी पैसे देण्याचे आदेश दिले होते. व्यापार्‍यांची मालमत्ता विकून 75 लाख रुपये जमा झाले असताना सव्वादोन कोटींचे वाटप केले गेल्याचा खोटा कांगावा समितीतर्फे केला गेला. किरकोळ पैसे देऊन उत्पादकांची दिशाभूल करत सह्या घेतल्या गेल्या व शेतकर्‍यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी या दबावाला न जुमानता आंदोलन सुरूच ठेवल्याने आज 14 शेतकर्‍यांना त्यांच्या घामाचा दाम मिळत आहे. प्रतिज्ञापत्र दिलेल्या शेतकर्‍यांना कांद्याची थकित रक्कम जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे ठाकरे यांनी बोलताना सांगितले.

यावेळी सतीश मोरे, ज्ञानेश्वर चव्हाण, सागर पाटील या कांदा उत्पादक शेतकर्‍यांसह राष्ट्रवादीचे नेते विनोद शेलार यांची भाषणे झाली. कार्यक्रमास अनंत भोसले, नीलेश पाटील, चिंतामण पगारे, महेश शेरेकर, बाळू वाणी, महिला तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सुचेता सोनवणे, वैशाली मोरे, शीतल खैरनार, प्रकाश वाघ, अशोक ह्याळीज, मधुकर देवरे, नीलेश ठाकरे, संदीप ठाकरे, अनिल पाटील, गणेश चौधरी, मुकेश शर्मा, योगेश भावसार, सुहास भावसार आदींसह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय जगताप यांनी तर आभार नीलेश पाटील यांनी मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com