ऑक्सिजनची साखळी जोडू या...करोनाची कडी तोडू या

ऑक्सिजनची साखळी जोडू या...करोनाची कडी तोडू या

नव्याने 100 ऑक्सिजन सिलेंडर नाशकात

नाशिक । प्रतिनिधी

तरुण पिढीला वाचविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा ही जाणीव झाल्याने पंचवटीतील तरुणांनी श्रीमंत छत्रपती संभाजीराजे वैद्यकीय मदत केंद्राची स्थापना केली आहे.या केंद्राच्या माध्यमातून बाधीत गरजवंत रुग्णांना घरपोच ऑक्सीजन सिलेंडर सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

करोना सध्या राज्यात धुमाकुळ घालतो आहे. विशेषतः तरुणांवर याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असल्याने तरुणपिढी संक्रमणाला बळी पडत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा करोना तरुणांना मोठ्या प्रमाणावर बाधीत करण्याचे प्रमाण वाढण्याचे कारण स्पष्ट करतांना प.बंगालमधील मायक्रोबायोलॉजीस्ट डॉ.श्रीधर चिन्नास्वामी यांनी या वयोगटातील सारख्या क्षमतेची प्रतिकार शक्ती कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. म्हणूनच आपल्या तरुण पिढीला वाचविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा. ही जाणीव झाल्याने पंचवटीतील तरुणांनी श्रीमंत छत्रपती संभाजीराजे वैद्यकीय मदत केंद्राची स्थापना करून या केंद्राच्या माध्यमातून बाधीत गरजवंत रूग्णांना घरपोच ऑक्सिजन सिलेंडर सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

छत्रपती वैद्यकीय मदत केंद्राचे मुख्य प्रवर्तक आरोग्यदूत तुषार जगताप यांनी गरजवंत रूग्णांसाठी घरपोच ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध करून देण्याचा संकल्प सोडला आहे.गेल्या दोन- तीन दिवसात दोनशेहून अधिक रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला असून या प्राणवायू यज्ञामुळे जीवदान मिळाले आहे. आरोग्यदूत तुषार जगताप यांच्या संकल्पनेतून उभे राहिलेल्या या जीवनदान यज्ञाचा वेग आणखी वाढला असून आता रोज शंभर गरजवंत रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. नव्या मोहीमेअंतर्गत शहराच्या विविध भागात कार्यरत असलेल्या तरुण समन्वयकांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून संबधित भागातील गरजवंत रुग्णाला या तरुणांच्या मार्फत ऑॅक्सीजन पुरवठा केला जाणार असल्याने प्रतिदिन शंभर जणांचा जीव वाचवता येणार आहे.

करोनाच्या दुसर्‍या लाटेचा राजकारणाची मुळ घट्ट रोवण्यासाठी वापर केला जात असतांना आरोग्यदूत तुषार जगताप यांनी स्वतःच्या हिमतीवर ऑक्सिजन चेन निर्माण करून तरूण पिढीच्या मदतीने जीव वाचविण्याचा सोडलेला संकल्प म्हणूनच अधोरेखीत झाला आहे.

करोनाची ही दुसरी लाट थोपविण्यासाठी शासन प्रशासन पातळीवर ब्रेक द चेन मोहीम कडक निर्बंधासह राबवली जात आहे.आरोग्यदूत तुषार जगताप यांनी तरूणांना सोबत घेऊन सुरू केलेली ही ऑक्सीजनची साखळी ब्रेक द चेनला बळ देणारी असून ऑक्सीजन साखळीत प्रत्येक तरुणाने कडी बनून सहभागी झाल्यास करोनाची कडी तोडण्यास वेळ लागणार नाही. आरोग्यदूत तुषार जगताप आता ऑक्सीजन मॅन म्हणून समाजात ओळखले जात आहे.त्यांचा संकल्प धडाडीने पुढे नेण्यासाठी तरूण वर्गही सरसावला ही करोनाविरूध्दच्या लढाईला बळ देणारी सकारात्मक घटना मानली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com