कसबे सुकेणे। Sukena

कसबे सुकेणे शिवारातील मंदाकिनी माता मंदिर परिसरात गंगापूर कॅनॉल लगत गेल्या पंधरा दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून या बिबट्याचा त्वरित वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.

सुकेणे परिसरात शुक्रवार दि.25 रोजी रात्रीच्या सुमारास बिबट्याने सदाशिव त्र्यंबक शेवकर यांच्या वस्तीवरील दोन डॉगरमॅन जातीच्या कुत्र्यांचा फडशा पाडला. याशिवाय गेल्या पंधरा दिवसापासून या परिसरातील वस्तीवरील कुत्रे बिबट्याने फस्त केले असून परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

सध्या गंगापूर कालव्याला पाणी असून लोकांना रात्रीचा दिवस करुन गहू, हरभरा, ऊस व द्राक्षबागांना पाणी द्यावे लागत आहे. या परिसरात आठवड्यातील चार दिवस रात्रीची थ्री फेज लाईट असल्याने रात्रीच पिकांना पाणी द्यावे लागते. त्यामुळे या बिबट्याची दहशत येथील शेतकर्यांनी घेतली असून पिकांना पाणी देण्यासाठी अडसर येत असल्याने पाण्याविना पिके जळू लागली आहे.

तसेच परिसरातील शेतकर्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुभती जनावरे पाळली आहे. मात्र आता बिबट्याच्या मुक्त संचारामुळे जनावरे सुरक्षित ठेवण्याचे आव्हान शेतकर्यांसमोर उभे ठाकले आहे.

परिसरातील कुत्रे, कोल्हे, लांडगे, वासरे आदींचे प्रमाण घटले असून कसबे सुकेणेसह संपूर्ण परिसर बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असल्याने शेतीमशागतीची कामे ठप्प होऊ लागली आहे. त्यामुळे वनविभागाने बिबट्या जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरे लावून हा परिसर बिबट्यामुक्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ करीत आहेत.