ओझे । वार्ताहर Dindori / OZE

दिंडोरी तालुक्यातील कादवा नदी परिसरामधील ओझे, करंजवण, म्हेळुस्के, लखमापूर गावामध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे. बिबट्याने आता कुत्र्यांना आपले लक्ष केल्यामुळे मळ्याच्या वस्तीवरील कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. मळ्यात राहणार्या कुटूंबामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री वेळी घरा बाहेर पडणे म्हणजे जीव धोक्यात घालणे अशी परिस्थिती या परिसरामध्ये निर्माण झाली आहे.

दोन दिवसापुर्वी ओझे येथे मळ्याच्या वस्तीवर पहाटे चार सुमारास दोन कुत्र्यांवर हल्ला करून हे गायब करण्यात आले. घराच्या दरवाजा पर्यत बिबट्यां आल्यामुळे घराच्या बाहेर कुणी आले नाही. सध्या हे बिबट्ये राजरोज वावरत असल्यामुळे मळ्यामध्ये वाडी वस्त्यांवर कुंटुबांमध्ये भितिचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पाच वर्षापासून या परिसरामध्ये बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.

आतापर्यत लहान बालकासह गायी, वासरे, कुत्रे, मांजरावर अनेक हल्ले करून बिबट्यांने आपली शिकार भागविली आहे. रात्रीच्या सुमार हे बिबट्ये मुक्त संचार करीत आहे. रस्त्यांवरही लोकांना आडवा जात असल्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. कादवा नदीच्या परिसरामध्ये बारा महिने मुबलक पाणी उपलब्ध आहे. हा परिसर ऊसाचे खोरे म्हणून ओळखला जातो. त्यामुळे बिबट्याला येथे लपण्यासाठी जागा उपलब्ध आहे.

या ऊसामध्ये अनेक ठिकाणी बछडे आढळून येत आहे, म्हणजे आता बिबट्यानी जंगल सोडून ऊसाच्या शेताचा आसरा घेतला सध्या सर्वात जास्त बिबट्ये ऊसाच्या शेतातच दिसून येत आहे. त्यामुळे शेतकर्यांना ऊसाच्या शेताला पाणी देण्यास अडचणी येत आहे. या परिसरामध्ये अनेक वेळा वनविभागाने पिंजरा लावूनही बिबट्यां पिंजर्यांमध्ये येत नाही.

एकाच वेळी अनेक ठिकाणी बिबट्ये दिसत असल्यामुळे वनविभागाकडे पिंजर्यांची संख्या मर्यादित असल्यामुळे अडचणी येत आहे. ज्याप्रमाणे तालुक्यात बिबट्याची संख्या वाढ आहे. त्याप्रमाणात वनविभागाने पिंजर्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.