खेडगाव l Khedgaon (वार्ताहर) :

दिंडोरी तालुक्यातील खेडगाव परिसरात गेल्या दोन-तीन दिवसापासून बिबट्याचा धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या वेळेत परिसरातील पाळीव कुत्रे, शेळ्या, वासरे फस्त करत आहे.

काल मंगळवारी मध्यरात्री दोन-अडीच वाजेच्या सुमारास खेडगाव येथील शेतकरी बाळासाहेब बाबुराव सोनवणे यांच्या वस्तीजवळ गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला चढवत फस्त केले आहे. परिसरातील अनेक नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाल्याचे निदर्शनात आले असून शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

तसेच रात्रीच्या वेळेत घरातून बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. तरी परिसरात पिंजरे लावण्यात येऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सदर घटनेची माहिती वनविभागाला दिली असता वनरक्षक अधिकारी सुरेखा खजे यांनी परिसरातील शेतात प्रत्यक्ष पाहणी केली असता बिबट्याचा पायांची ठसे आढळून आले. सध्या बिबट्याचा संचार असलेल्या परिसरात लवकरच पिंजरा लावला जाईल असे आश्वासन वनविभाग अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.

बिबट्याच्या पायांच्या ठश्यावरून परिसरात बिबट्या असल्याचा अंदाज असून कुत्रे, शेळ्या वासरे यांना निशाना करत असून नागरिकांनी घाबरून न जाता लहान मुलांची काळजी घ्यावी.
सुरेखा खजे, वनरक्षक अधिकारी