
नाशिक । प्रतिनिधी Nashik
दोन दिवसांपूर्वी ठक्कर डोम परिसरात ( Thakkar Dom Area ) बिबट्याने दर्शन( Leopard Sighted ) दिले होते. त्यापाठोपाठ काल सातपूर औद्योगिक वसाहतीत बिबट्याचे दर्शन झाल्याने कामगार उद्योजक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
परिसरातील औद्योगिक वसाहतीमध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास नाईस एमआयडीसी भागातील नीलकमल मार्बल कंपनीलगत बिबट्याचे दर्शन झाले होते.
त्यापूर्वी याच परिसरातील ज्योती सिरॅमिकमध्ये ( Jyoti Ceramic Company )बिबट्या दिसला असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. त्यानंतर बिबट्या वनराईमध्ये गेला असेल, अशी शंका व्यक्त केली जात असल्याने वनविभागाच्या अधिकार्यांनी हा परिसर पिंजून काढला. सकाळी जॉगींगला आलेल्या नागरिकांना परत पाठवण्यात आले. तसेच सायंकाळच्या जॉगिंगसाठी ट्रॅक बंद केला असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान निवेकच्या संपूर्ण मैदानाची कसून तपासणी केली. निवेक व जलशुद्धीकरण केंद्रातील भागाची पहाणी अधिकार्यांनी केली. मात्र त्या परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे अथवा त्याच्या वावराच्या पाऊल खुणा देखिल आढळून आले नसल्याचे वन खात्याचे अधिकारी ओंकार देशपांडे, साहेबराव महाजन व सचिन आहिरे यांनी सांगितले.
निवेकलगत कॅनाल रोड आहे. त्यामुळे त्या मार्गाने बिबट्या जंगलात जाण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने व्यक्त केली. लोकांनी या बाबत सहकार्य करावे. या परिसरासाठी दोन गाड्या व पाच पोलीस तैनात करण्यात आले आहेत. लोकांनी अफवा पसरवू नये. मात्र बिबट्या दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन दुय्यम निरीक्षक सतीश घोटेकर यांनी केले.