‘बिबट्यादूत’ चा लवकरच श्रीगणेशा
नाशिक

‘बिबट्यादूत’ चा लवकरच श्रीगणेशा

निधीची जुळवाजुळव सुरू

Bharat Pagare

नाशिक | Nashik

नाशिकमधील दारणाखोऱ्यात बिबट्या व मानव संघर्ष कमी करण्यासाठी जुन्नर पॅटर्नच्या धर्तीवर ‘बिबट्यादूत’ तयार करण्याचा उपक्रम निधीअभावी रखडण्याची चिन्हे असतानाच, आता वन्यजीव संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांची मदत घेतली जाणार आहे.

वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी या उपक्रमात विशेष लक्ष घातल्याने महिन्याभरात निधीची जमवाजमव करून मोहीमेचा श्रीगणेशा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दारणाखोऱ्यातील बिबट व मानव संघर्ष रोखणे सोयीस्कर होईल, असा आशावाद वन विभागाने व्यक्त केला आहे.

दारणाखोऱ्यातील दोनवाडे, बाभळेश्वर, पळसे, चांदगिरी, चाडेगाव, जाखोरी, सामनगाव, चिंचोली, राहुरी व आजूबाजूच्या भागात बिबट व मानव संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न वन विभाग करत आहे. येथील बिबट्यांचा अधिवास आणि संघर्षाचा अभ्यास करण्यासाठी गेल्या महिन्यात वन्यजीव अभ्यासकांनाही पाचारण करण्यात आले. तेव्हापासून ‘जुन्नर पॅटर्न’ राबविण्यासंदर्भात कार्यवाही सुरु आहे.

शाळा-महाविद्यालये बंद असल्याने उपक्रमास विलंब होत असल्याचे पहिल्यांदा सांगण्यात आले. त्यानंतर निधीअभावी प्रस्ताव रखडल्याची चर्चा सुरु होती. मात्र, आता थेट वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनीच येत्या महिन्याभरात उपक्रमाचा श्रीगणेशा होणार असल्याची माहिती दिली आहे. नाशिक पश्चिमसह अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयाकडून याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. वर्षभर वन्यजीव अभ्यासक दारणाखोऱ्यात तळ ठोकून राहणार असून या उपक्रमातून शाळा-कॉलेजांमध्ये ‘बिबट्यादूत’ तयार केले जाणार आहेत. हे दूत वन्यजीव संवर्धनाची विशेष जबाबदारी पार पाडणार आहेत.

चाैकट१

दारणाखोऱ्यात आतापर्यंत बिबट्यांकडून मानवावर नऊ हल्ले झाले असून पाच जणांचे दुर्दैवी मृत्यू झाले आहेत. गेल्या दीड महिन्यापासून परिसरातील बिबट्यांना जेरबंद करुन नरभक्षक बिबट्या ओळखण्याची कार्यवाही सुरु आहे. त्याबाबतचे अहवालही हैदराबाद येथे पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत अकरा बिबटे कैद झाले असून सहा नर आणि पाच मादी बिबट्यांचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com