नाशिक | प्रतिनिधी

नाशिक वनक्षेत्रातील पाथर्डी शिवारात आठ दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. अनेक दिवसांपासून संचार असलेला बिबट्या जेरबंद झाल्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे...

अधिक माहिती अशी की, पाथर्डी शिवारातील नितीन ढेमसे यांच्या मालकी गट नंबर 184 येथे आज (दि 9) पहाटे बिबट्या जेरबंद झाला.

याबाबतची माहिती आज सकाळी परिसरातील नागरिकांनी वनविभागाला दिली. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपाल अनिल आहिराव, वनरक्षक विजयसिंग पाटील, प्रवीण राठोड, नाना जगताप यांनी बिबटयाला सुरक्षित रित्या गंगापूर रोपवाटिका येथे नेले.

हा बिबट्या अंदाजे तीन ते चार वर्ष वयोगटातील असल्याचे अंदाज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा संचार असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली होती.

यानंतर याठिकाणी बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. नागरिकांनी यापुढेही सावध राहावे असे आवाहन भदाणे यांच्याकडून करण्यात आले आहे.