धरणगांव वीर परिसरात बिबट्यांचा वावर; एक बिबट्या जेरबंद

धरणगांव वीर परिसरात बिबट्यांचा वावर; एक बिबट्या जेरबंद

खेडलेझुंगे | वार्ताहर

खेडलेझुंगे, कोळगांव, सारोळे थडी, धारणगाव परिसरामध्ये मोठ्याप्रमाणावर बिबट्यांचा वावर आहे. त्यमुळे परिसरामध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरीकांमध्ये मोठ्याप्रमाणावर दहशीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. नुकताच वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला असून इतरही बिबटे वनविभागाने ताब्यात घ्यावेत अशी मागणी केली जात आहे...

परिसरामध्ये मोठ्याप्रमाणावर पाळीव प्राण्यांचा फडशा बिबट्याने पाडलेला आहे. सद्या सुरु असलेल्या उस तोडणीमुळे आणि अवकाळी आणि वातावरणातील सततच्या बदलामुळे तोडलेली फळबागे यामुळे बिबट्यांचा सर्रास वावर याठिकाणी दिसून येतो आहे.

परिसरामध्ये नेमके किती बिबट्यांचा वावर आहे हे सांगता येणार नाही. परंतु परिसरामध्ये मोठ्याप्रमाणावर बिबट्यांचा वावर असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे वनविभागाकडून दोन ठिकाणी पिंजरा उभारण्यात आला होता.

गेल्या आठवडाभरापासुन या परिसरात बिबट्यांची दहशत मोठ्याप्रमाणावर वाढलेली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या उपजिविकेवर तसेच व्यवसायावर परिणाम होत असुन भितीचे सावट पसरलेले आहे.

त्यातच विज वितरण कंपनीकडुन शेतीसाठी रात्रीचा विजपुरवठा होतो. त्यामुळे परिसरातील शेतकरण्यांना शेतीला पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री जावे लागते. त्यातच परिसरामध्ये बिबट्याची वावर वाढल्याणे शेतकऱ्यांच्या जिवावर बेतण्यासारखे आहे.

परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याची बातमी नागरिकांकरवी वनखात्याला कळताच त्यांनी परिसरात मंगळवारी पिंजरा लावलेला होता. यानंतर याठिकाणी एक बिबट्या वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात अडकल्याचे दिसुन आला.

तरीही भय इथले संपलेले नाही. पिकांना पाणी देणे अशक्य होत आहे. अजुनही परिसरामध्ये किती बिबटे आहेत याची माहीती नसल्याने नागरिकांमध्ये ह्या विषयी चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच वीजपुरठा दिवसाचा करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

पिंजऱ्यात अडकलेला बिबट्यास वन विभागाचे अधिकारी महाले व शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील ग्रामस्थ अमोल गंभिरे, राहुल गंभिरे, महेश गंभिरे, संजय गंभिरे, अजय गंभिरे, मन्सुर शेख, ॠशीकेष गंभिरे, स्वप्नील गंभिरे आदींच्या सहकार्याने बिबट्याला वनविभागाकडे पाठविण्यात आले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com