बिबट्या
बिबट्या
नाशिक

निफाड कोळगाव येथे बिबट्या जेरबंद

पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी

Gokul Pawar

Gokul Pawar

निफाड | Niphad

गोदाकाठच्या पूर्व भागातील तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या कोळगाव येथे सुधाकर घोटेकर यांच्या गट नं.१४ मध्ये लावलेल्या पिंजर्‍यात ६ वर्ष वयाचा बिबट्या जेरबंद झाला आहे.

कोळगाव शिवारात बिबट्याच्या संचाराने ग्रामस्थ भयभित झाले आहेत. बिबट्यासह मादीने परिसरात शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, कोल्हे, वासरे यांचा फडशा पाडत अनेक नागरिकांना दर्शन दिल्याने अखेरीस (दि.१३) जुलै रोजी वनविभागाने सुधाकर छबु घोटेकर यांच्या गट नं.१४ मध्ये पिंजरा लावून त्यात भक्ष्य म्हणून शेळी ठेवण्यात आली होती. काल बुधवार (दि.१५) रोजी पहाटेच्या सुमारास भक्ष्य शोधण्याच्या नादात बिबट्या पिंजर्‍यात शिरला अन् अलगद अडकला.

बिबट्या कैद झाल्याचे समजताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनरक्षक विजय टेकनर, वनसेवक भैय्या शेख, आर.एल. बोरकडे, भगवान भुरुक आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पिंजर्‍यासह बिबट्यास निफाडच्या रोपवाटिकेत आणले. तेथे पशुवैद्यकीय अधिकारी रवींद्र चांदोरे यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली.

तसेच सहाय्यक वनसंरक्षक सुजित नेवसे यांनीही बिबट्याची पाहणी केली. जेरबंद करण्यास आलेल्या बिबट्यास पुन्हा जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनी म्हटले आहे.

बिबट्या जेरबंद करण्यासाठी उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक सुजित नेवसे यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान कोळगाव शिवारात अद्यापही बिबट्याच्या मादीचा मुक्त संचार सुरू असून मादी जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पुन्हा पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com