
नाशिक | Nashik
इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील तळेगाव शिवारात (Talegaon Shivar) कपारेश्वर महादेव येथे डोंगराजवळ फिरायला गेलेल्या नागरिकांना (Citizens) आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास बिबट्या मुक्तसंचार करतांना दिसला. त्यानंतर परिसरातील नागरिक भयभीत झाल्याने तात्काळ वनविभागाला कळविण्यात आले असता वनविभागाने बिबट्याला जेरबंद केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तळेगाव येथील डॅम परिसरात असणाऱ्या पाळीव प्राण्यांना खाण्यासाठी बिबट्या (Leopard) येत असल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला. पंरतु, नागरिकांनी जवळ जात पहिले असता बिबट्या शांततेत चालत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी या बिबट्याला जास्त वेळ डोळे उघडे ठेवता येत नसल्याचे दिसले. यानंतर येथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी या बिबट्याचे फोटो आणि व्हिडीओ काढले.
त्यानंतर घटनेची माहिती मिळाल्यावर वनविभागाचे (Forest Department) अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना बिबट्याच्या हालचालीवरून तो आजारी आणि उपाशीपोटी असल्याचे जाणवले. त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी शिताफीने त्याला पकडून पिंजऱ्यामध्ये (Cage) जेरबंद केले.
दरम्यान, बिबट्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला तातडीने पुढील उपचारासाठी नाशिक येथील बिबट उपचार व निवारा केंद्रात (Leopard Treatment and Shelter Centre) हलविण्यात आले असून सद्यस्थितीत त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच बिबट्याची अशी अवस्था नेमकी कशामुळे झाली याचा तपास वनाधिकारी करत आहेत.