सिन्नर
सिन्नर

सिन्नर : चिंचोली शिवारात बिबट्या जेरबंद

बिबट्याची सुरक्षित स्थळी रवानगी

सिन्नर | Sinner

तालुक्यातील चिंचोली शिवारात गुरुवारी (दि.३०) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. गेल्या पाच दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्यात आला होता.

महादू लहाणू सानप यांच्या शेत गट नंबर 31मध्ये गेल्या आठवड्यात बिबट्याचा बछडा आढळून आला होता. या भागात तीन ते चार बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सानप यांच्या शेतात दि. २५ जुलै पासून शेळीसह पिंजरा ठेवण्यात आला होता.

गुरुवारी रात्री भक्ष्याच्या शोधात आलेला पाच ते सहा वर्षे वयाचा पूर्ण वाढ झालेला नर बिबट्या या सापळ्यात अलगद अडकला. आज (दि. ३१)सकाळी वन कर्मचाऱ्यांनी बिबट्यासह पिंजरा मोहदरी घाटातील वन उद्यानात हलवला. तेथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशाने या बिबट्याची सुरक्षित स्थळी रवानगी करण्यात आली.

परिसरात अद्यापही बछड्यांसह मादी बिबट्याचे वास्तव्य असावे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे परिसरात पुन्हा एकदा पिंजरा लावण्यात आला आहे.

Last updated

Deshdoot
www.deshdoot.com