
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar
काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) पिंपळद येथे बिबट्याच्या हल्ल्यात (leopard Attack) सात वर्षीय बालिकेचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली होती. त्याअगोदर देखील तालुक्यातील वेळुंजे, ब्राम्हणवाडे या गावांत बिबट्याच्या हल्ल्यात लहान बालकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक भयभीत झाले होते.
त्यानंतर याठिकाणी पिंजरा (Cage) लावण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली होती. यानंतर वनविभागाने परिसरातील आजूबाजूच्या गावातील महत्वाच्या भागांत पिंजरे लावले होते. त्यावेळी सापगाव परिसरात देखील एक पिंजरा लावण्यात आला होता. त्यानंतर आता याठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात परिसरात धुमाकूळ घालणारा मादी बिबट्या अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर जेरबंद झाला आहे.
आज सकाळी १० वाजेच्या सुमारास तालुक्यातील सापगाव (Sapgaon) येथून दोन किमी हवाई अंतरावर बिबट मादी वय अंदाजे ३ वर्षे कॅनल लाइनमध्ये अडकल्याची माहिती स्थानिकांकडून वनविभागाला कळविण्यात आली. त्यानंतर त्र्यंबकेश्वर ,नाशिक व इगतपुरी येथील वन अधिकारी, कर्मचारी व नाशिक येथील रेस्क्यू विभागाच्या टीमचे सकाळपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. यानंतर सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास बिबट्याला जेरबंद (Caught) करण्यात अधिकाऱ्यांना यश आले. त्यामुळे मळ्यात वस्ती करून राहणाऱ्या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
दरम्यान, आजूबाजूच्या परिसरात एकापेक्षा अधिक बिबटे असल्याचे बोलले जात आहे. तसेच या बिबट्यांनी आतापर्यंत काही जनावरांवर हल्ला केला असून अनेक कुत्रे फस्त केली आहेत. त्यामुळे संध्याकाळी चार वाजेनंतर स्थानिकांचे घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे.