देवळाली कॅम्प | Deolali Camp

येथील लमरोड भागात असलेले जागृत देवस्थान महालक्ष्मी मंदिरच्या मागील बाजूस लष्करी हद्दी नजीक एका सोसायटीच्या आवारात लावलेल्या पिंजर्यात काल बिबट्या जेरबंद झाला. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मागील काही दिवसांपासून येथे बिबट्याचा संचार सुरू होता. येथील लष्करी हद्दीजवळ असणार्या महालक्ष्मी मंदिर परिसरात हार्मिनी होम्स हा सुमारे 25 एकरात पसरलेला परंतु पडीक प्रकल्प आहे. या परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा संचार सुरू होता.

दोन महिन्यापूर्वी नागरिकांच्या मागणीमुळे वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. मात्र त्यावेळी पिंजर्यात बिबट्या अडकला नाही. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी एका महिलेला बिबट्या दिसला होता. तसेच येथील पाळीव कुत्र्यांना देखील बिबट्याने आपले शिकार केले होते. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी पुन्हा पिंजरा लावला होता.

सोमवारी जेरबंद झालेल्या बिबट्याला वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, परिमंडळ अधिकारी अनिल अहिरराव, वनरक्षक विजयसिंह पाटील, उत्तम पाटील, राजेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेण्यात आले.