मेशी | Meshi

दैव बलवत्तर असेल, तर काळही माणसाच्या जिवावर घाव घालू शकत नाही, याची प्रचिती डोंगरगाव येथील युवकाने घेतली आहे.

डोंगरगाव येथील युवक सतीश सावंत आणि त्याची आई ताराबाई हे दोघेही दुचाकीने सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनाला शनिवारी सकाळी गेले होते. परतीचा प्रवास महात्मा फुलेनगर मार्गे डोंगरगाव असा सुरू झाला.

दरम्यान संध्याकाळी सुमारे साडेपाच वाजता महात्मा फुले नगर कडून एका आडवळणी रस्त्याने मळयात घरी जात असताना गाव ओलांडल्यावर काही अंतरावर गेले असता त्यांना रस्त्यावर बिबट्याचे बछडे गाडीला आडवे गेले. त्याला कसेबसे पार करून पुढे गाडी चालवत असतानाच पाठीमागच्या बाजूने मादी बिबट्याचे अचानक दर्शन झाले.

घाबरून न जाता प्रसंगावधान राखून गाडीचा वेग वाढविला परंतु पाठीमागून बिबट्याने बरेच अंतरापर्यंत गाडीचा पाठलाग केला. अशाही परीस्थितीत डगमगुन न जाता आरडाओरड करत गाडी वेगाने पुढे नेली. काही अंतराचा पाठलाग करून बिबट्या त्याचे बछडे मागे राहिल्याने माघारी परतले. बेवारस रस्ता असल्याने कोणाचीही मदत मिळणे अगदी दुरापास्त होते परंतु केवळ सकारात्मक प्रसंगावधान दाखवून त्यांनी स्वतःचा जीव वाचविला. सदर घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मेशी, डोंगरगाव तसेच महात्मा फुले नगर परिसरातील शेतकरी यांनी रात्री अपरात्री घराबाहेर निघु नये. आवश्यक असल्यास खबरदारी घ्यावी.

- सतीश सावंत, प्रत्यक्षदर्शी