देवळा | विशेष प्रतिनिधी

तालुक्यातील मोहन पोपट पवार यांच्या गुरांच्या गोठ्यावर बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला. पवार यांनी गोठ्यावर फिरत असलेल्या बिबट्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये कैद केला असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे...

काल (दि. २८) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पवार हे आपल्या घरात असतांना घरासमोर असलेल्या गोठ्यावर बिबट्याचे बछडे फिरतांना दिसून आले. पवार यांनी हा सर्व प्रकार लगेच आपल्या मोबाईल मध्ये कैद केला.

पाच दिवसांपूर्वी कडू शंकर पवार यांच्या मालकीचा कुत्रा देखील बिबट्याने फस्त केला आहे. तर काकाजी पवार यांना देखील दोन दिवसांपूर्वी या बिबट्याने दर्शन दिल्याचे ते सांगतात.

भऊर परिसरात गिरणा नदीकाठी नदीच्या दोन्ही बाजूने मोठया प्रमाणात काटेरी झाडे असल्याने बिबट्याला येथे लपण्यास मुबलक जागा उपलब्ध असल्याने या परिसरातील नागरिकांना नेहमी बिबट्याचे दर्शन होत असते.

आठवड्यातून तीन ते चार दिवस रात्रीचा विद्युत पुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी नाइलाजाने रात्री जीव धोक्यात घालून शेतकरी वर्गला शेतात जावे लागते. त्यामुळे या भागातील शेतकरी प्रचंड दहशतखाली आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी लवकरात लवकर पिंजरा बसवण्याची मागणी या परिसरातील नागरिक करत आहेत.