कायद्यांचा उद्देश अपप्रवृत्तींना आळा: न्या.कापडे

वाघ महाविद्यालयात विधी जनजागृती कार्यशाळा
कायद्यांचा उद्देश अपप्रवृत्तींना आळा: न्या.कापडे

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी | Pimpalgaon Basvant

अपप्रवृत्तींना आळा घालून सुसंस्कृत समाज घडविणे हाच कायद्याचा उद्देश आहे. म्हणून प्रत्येकाने कायद्याचा आदर केला पाहिजे. आपली वर्तणूक कायदेशीर असली पाहिजे असे मत येथील दिवाणी न्यायाधीश पी.के. कापडे (Judge P.K. Kapde) यांनी व्यक्त केले.

येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात (Karmaveer Kakasaheb Wagh College) कायदेविषयक जनजागृती कार्यशाळेनिमित्त (Legal Awareness Workshop) आयोजित कार्यक्रमात न्या. कापडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वकील संघाचे अ‍ॅड.बी.आर. जाजू, अ‍ॅड.के.पी. भटेवार, अ‍ॅड.आर.टी. चव्हाण, अ‍ॅड.एस.ई. आहेर, अ‍ॅड.आर.व्ही. गवळी, अ‍ॅड.त्रिभुवन गायकवाड, अ‍ॅड.श्रीमती. मोगल, अ‍ॅड.एस.के. शेलार, अ‍ॅड.प्रभाकर घुमरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप शिंदे, उपप्राचार्य प्रा.ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य प्रा.डी.एस. माळोदे, ए.एन. बागुल उपस्थित होते.

न्या. पी.के. कापडे पुढे म्हणाले की, आज तरुणांमध्ये सोशल मीडियाचे (social media) व्यसन अधिक प्रमाणात वाढत असून त्यावरील समाजविघातक प्रवृत्तीचे अंधानुकरण करण्याने समाजात विकृतीचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. त्यातूनच लहान मुला-मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार (Sexual assault) सर्वत्र वाढत चालले आहेत. प्रसारमाध्यमांचा वापर दक्षतेने करणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर गुन्हे शाखा (Crime Branch) बारकाईने नजर ठेवत असते. त्यामुळे कोणताही संदेश पाठविताना धार्मिक द्वेष, भावना, अपमान होईल, भावना दुखावल्या जाणार नाहीत यांची काळजी घेतली पाहिजे.

लैंगिक अत्याचार विषयक ‘नाल्सा कायदा-2015’ (NALSA Act-2015) आणि ‘पोक्सो कायदा-2012’ (POCSO Act-2012) या विषयावर या शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विषयतज्ज्ञ अ‍ॅड.बी.आर. जाजू यांनी बालकांचे लैंगिक अत्याचार (Child sexual abuse) यासंदर्भात मार्गदर्शन करताना पोक्सो कायद्यांतर्गत अनेक तरतुदी केल्या आहेत. यामध्ये तक्रार दाखल झाल्यास गुन्हेगाराला योग्य ती शिक्षा दिली जाते आणि पीडितांचे नाव गोपनीय ठेवून अत्यंत संवेदनशीलतेने ते प्रकरण हाताळले जाते अशी माहिती त्यांनी दिली. पॉस्को कायदायची जनजागृती समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत व्हावी असे आवाहन यानिमित्ताने त्यांनी केले.

यावेळी अ‍ॅड.श्रीमती.के.पी. भटेवरा यांनी नाल्सा कायदा 2015 महत्त्व विशद करताना मुला-मुलींच्या तस्करी व लैंगिक शोषण पिडीत व्यक्तींसाठी निशुल्क सेवा या कायद्याच्या अंतर्गत समाजातील पिडीत व्यक्तींना नुकसान भरपाई, पुनर्वसन आणि सामान्य लोकांप्रमाणे अधिकार यामध्ये रेशनकार्ड, मोफत शिक्षण, रहिवासी शाळा, वृद्ध महिलांसाठी पेन्शन योजना, मतदानाचा अधिकार आणि मोफत न्यायालयीन सेवा उपलब्ध करून दिल्या जातात अशी कायद्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ.दिलीप शिंदे यांनी तरुणांमध्ये कायदेविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून विद्यार्थ्यांनी कायद्यांचा अभ्यास करण्याचे आवाहन यावेळी विद्यार्थ्यांना केले. अ‍ॅड. आर.व्ही. गवळी यांनी आभार मानले. तर उपप्राचार्य प्रा. ज्ञानोबा ढगे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com