सरपंचपदाची आरक्षण सोडत २८ जानेवारीला

तहसिलदारांकडे निर्णय : राजकिय वर्तुळाचे लक्ष
सरपंचपदाची आरक्षण सोडत २८ जानेवारीला

नाशिक । Nashik

ग्राम पंचायत निवडणुकीचा निकाला नंतर विजयाचा गुलाल उधळला गेला असून आता येत्या गुरुवारी (दि.२८) ११ तालुक्यातील ८१० ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत निघणार आहे.

तालुका स्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढली जाईल. त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतीचे निकाल सोमवारी (दि.१८) लागले. त्यानंतर गावचा सरपंच कोण होणार याकडे लक्ष लागून होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील अंशत: अनुसुचित क्षेत्रातील पाच तालुके आणि बीगर अनुसूचीत क्षेत्रातील सहा तालुके अशा अकरा तालुक्यांसाठीच्या ८१० ग्रा.पंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत गुरुवारी निघणार आहे. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच ५५ ग्रा़मपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या.

देवळा तालुक्यातील उमराणे येथील निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाने रद्द केली होती. निकालानंतर या ६२१ ग्रा.सरपंच कोण असतील याची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. त्यासाठीच्या आरक्षण सोडतीची तारीख देखिल ग्रामविकास विभागाने जाहिर केली आहे.

जिल्ह्यात १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ या पाच वर्षाच्या काळासाठी १ हजार ३८५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीचे हे आरक्षण जाहीर होणार आहे.

त्यातील पेठ, सुरगाणा, कळवण व त्रंबकेश्वर या चार पुर्णत:अनुसूचीत क्षेत्रासाठीच्या ५७५ ग्रामपंचायतींचे आरक्षण वगळुन उर्वरीत ११ तालुक्यांसाठीच्या ८१० ग्रामपंचायतींसाठी ही आरक्षण सोडत राबवली जाणार आहे. तहसिलदार स्तरावर आरक्षण सोडतिचे अधिकार देण्यात आले आहे. आरक्षण सोडतनंतर सरपंचपदासाठी निवडणूक होईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com