Minor Irrigation
Minor Irrigation |Fulenagar Sinnar
नाशिक

फुलेनगरच्या पाझर तलावाला गळती

१९७२ च्या दुष्काळात झालेला तालुक्यातला पहिला बंधारा

Vilas Patil

Vilas Patil

वावी : वार्ताहर

तालुक्याच्या पूर्व भागातील फूलेनगर येथील सर्वात मोठ्या लघूपाट बंधाऱ्याला गळती लागल्याने या माती बंधाऱ्याचे आयुष्य धोक्यात आले आहे. पाटबंधारे विभागाने तातडीने गळती थांबवण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

तालुक्याच्या पूर्व भाग हा दुष्काळी म्हणून सर्वदूर प्रसिध्द आहे. हा दुष्काळ कमी व्हावा यासाठी तत्कालीन आमदार कै. शंकरराव नवले बाबा यांनी 1964 मध्ये हा मातीचा बंधारा बांधला होता. त्यानंतर 1972 मध्ये पंचायत समितीचे तत्कालीन सभापती सुर्यभान गडाख यांनी पुढाकार घेऊन या बंधाऱ्याचे तालुक्यातील पहिल्या लघूपाट बंधाऱ्यात रुपांतर केले.

त्यालाच माळवाडीचा बंधारादेखील म्हटले जाते. परिसरातील फुलेनगर, घोटेवाडी, निऱ्हाळे, वावी या गावातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. हा 55 दशलक्ष घनफूट पाणी साठवण्याची क्षमता असलेला बंधारा भरल्यास परिसराचा तीन वर्षांचा पाणी प्रश्न मिटतो. मात्र, नंतरच्या काळात पावसाचे प्रमाण कमी झाले. बंधाऱ्यात गाळ भरला. त्यामुळे त्याची साठवण क्षमताही कमी झाली.

सन 2006 साली हा बंधारा तुडुंब भरून सांडव्यातून पाणी वाहीले होते. त्यानंतर आतापर्यंत या बंधाऱ्याची सांड वाहतांना दिसत नव्हती. समृध्दी महामार्गासाठी या बंधाऱ्यातला गाळ आणि माती काढण्यात आल्याने याची खोली व पाणी साठवण क्षमताही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

या बंधाऱ्याच्या पूर्व भागात यंदा मुबलक पाऊस असल्याने परिसरातील सर्व नदी-नाले, छोटे-मोठे बंधारे तुडुंब भरले आहेत. त्यामुळे हा बंधाराही भरला असून सांडवा अवघा फूटभर अंतरावर राहीला आहे. मात्र, पाण्याच्या दबावाने या बंधाऱ्याला गळती लागली असून त्यातून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या बंधाऱ्याची गळती थांबवावी अशी मागणी होत आहे.

फुलेनगर लघूपाट बंधारा गेल्या काही वर्षापासून भरलेला नव्हता. मात्र, यावर्षी मुबलक पाणी साठा झाला आहे. लघूपाट बंधाऱ्यात मोठमोठी झुडपे वाढल्याने बंधाऱ्याला काही ठिकाणी व सांडव्याला जास्त प्रमाणात गळती वाढल्याने या मातीच्या बंधाऱ्याला भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. पाटबंधारे विभागाने गळती थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत. बंधाऱ्यात वाढलेली झाडे कमी करावी.

किरण अत्रे, माजी सरपंच, फुलेनगर

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com