आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या : वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
नाशिक

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या : वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

Gokul Pawar

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत उन्हाळी २०२० च्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा घेण्याबाबत गठीत करण्यात आलेल्या शिफारशीनुसार या परीक्षा पुढील सुचनेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज येथे दिली.

विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षेबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीलीप म्हैसेकर यांनी प्रा. डॉ. मोहन खामगावकर, प्रतिकुलगुरु यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभा झाली.

सर्व वैद्यकीय शाखांचे अधिष्ठाता तसेच केंद्रीय परिषदेचे सदस्य डॉ. दर्शन दक्षिणदास, डॉ. कैलाश शर्मा व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एस.एस. सावरीकर हे यात सहभागी झाले होते.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर २०२० च्या परीक्षा पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात, या परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठांशी संलग्न असणाऱ्या प्रमुख संस्था, अध्यापक, पालक व विद्यार्थ्यांशी परामर्श करून त्यानंतर घेण्यात याव्यात तसेच परीक्षांचे अंतिम वेळापत्रक निश्चित करताना केंद्रीय परिषदांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी पर्याप्त कालावधी उपलब्ध करून देण्यात यावा अशा शिफारशी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षांच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच विद्यापीठाच्या कोणत्याही परिपत्रकाची खातरजमा करण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील माहिती ग्राह्य धरण्यात यावी असे आवाहनही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com