बदलत्या तंत्रज्ञानासोबत अद्ययावत असण्याची गरज; केटीएचएम महाविद्यालयात कार्यशाळा

बदलत्या तंत्रज्ञानासोबत अद्ययावत असण्याची गरज; केटीएचएम महाविद्यालयात कार्यशाळा

नाशिक : नव माध्यमांचा वेगाने प्रसार होत आहे. ट्टिटर, फेसबूक, व्हॉट्सॲप अशा अनेक माध्यमातून माहिती प्रसार वेगाने होत आहे. मानवी जीवनातील सर्व भाग इंटरनेटच्या प्रभावाने व्यापले गेला आहे. मात्र या नवमाध्यमांतून अफवा, चुकीचे संदेश, फेक न्यूज ओळखणे कठीण आहे. त्यासाठी प्रत्येकाने अद्ययावत असणे आवश्यक आहे, असा सूर दोन दिवशीय चर्चासत्रात उमटला.

निमित्त होते, केटीएचएम कॉलेजच्या बी. व्होक (मास मीडिया) या विभागाच्या वतीने ‘नवमाध्यमांचे समाजावर होणारे परिणाम’ या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे. या कार्यशाळेत महाराष्ट्र परिचय केंद्राचे माहिती उपसंचालक दयानंद कांबळे, वेब एडिटर विश्वनाथ गरुड, वेब तज्ज्ञ भाग्यश्री केंगे, विशाल राजोळे, पदमनाभ खापरे, मुक्त चैतन्य, आदी मान्यवरांनी यावेळी चर्चसत्रात सहभाग घेतला. यावेळी प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, नोडल ऑफिसर डॉ. एन. डी. गायकवाड, कार्यशाळा समन्वयक प्रा. विशाखा ठाकरे, प्रा. गोकुळ सानप उपस्थित होते.

यावेळी दयानंद कांबळे म्हणाले कि नव माध्यमातून एखाद्या विषय किंवा घटनेची माहिती तात्काळ प्राप्त होत असल्याने निर्णय प्रक्रियेत त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. त्यामुळे या माध्यमाविषयी साक्षरता वाढविणे गरजेचे आहे. जनतेने सजगपणे नव माध्यमाचा उपयोग केल्यास शासनाला धोरणे ठरविताना नागरिकांनी नव माध्यमातून व्यकत केलेल्या मतांचा उपयोग होऊ शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

तर इंटरनेट आणि मानवी संस्कृती यावर बोलतांना तज्ञ भाग्यश्री केंगे म्हणाल्या कि, मानवी जीवनातील सर्व भाग इंटरनेटच्या प्रभावाने व्यापले गेले आहेत. कृषी क्षेत्र, व्यवस्थापन, रस्त्यांवरील वाहतूक नियोजन, अर्थविषयक देवाणघेवाण, आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचे नियंत्रण आदी बाबींमध्ये ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’चा प्रभाव दिसून येतो. बदलत्या तंत्रज्ञानासोबत आपण स्वत:ला अद्ययावत करायला हवे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

सायबर अ‍ॅम्बिसिडर विशाल राजोळे यांनी ‘न्यू मीडिया व सायबर सिक्युरिटी’ या संदर्भात उपस्थिताना मार्गदर्शन केले. आजच्या युगात संगणकाचा वापर अधिक प्रमाणात होत असल्याने सायबर गुन्ह्याच्या संख्येतही अधिक वाढ होत आहे. सायबर बोल्लिंग, हॅकिंग, पोर्नोग्राफी, स्पायवेअर अप्लिकेशन चा वापर, मॉलवेअर,फिशिंग यांसारख्या अतिशय धोकादायक गोष्टींची जागरूकता व त्यापासून स्वतःला कसे दूर ठेवावे यांबद्दल सांगितले. तसेच मुक्ता चैतन्य यांनी नवमाध्यमांचे व्यसन आणि समाजावर होणारा परिणाम यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सोशल मीडियामुळे अनेकदा लोक नकारात्मकतेच्या गर्तेत जातात. यावर उपाय म्हणून या माध्यमांचा कमीत कमी वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या दोन दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांना रेडिओ, टेलिव्हिजन, वर्तमानपत्र, ते सोशल मीडियाचा वापर, वापराबाबतचे कौशल्य, सोशल मीडियाचे फायदे तोटे याबाबत सखोल माहिती देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसह प्राध्यापक उपस्थित होते.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com