Manmad water crises
Manmad water crises
नाशिक

मनमाडवासियांचा पाण्यासाठी संघर्ष

वाघदर्डी धरणात 75 टक्के पाणीसाठा असतांना

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

* 12 ते 15 दिवसाआड पाणीपुरवठा

* पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका

मनमाड । Manmad बब्बू शेख

‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ असाच काहीसा प्रकार मनमाड शहरात घडत आहे. वागदर्डी धरणात पाण्याचा मुबलक साठा असतांना देखील सव्वालाख शहरवासियांना पाणीटंचाईशी संघर्ष करावा लागत असल्याने तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील नागरिकांना भर पावसाळ्यात देखील भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. सध्या 12 ते 15 दिवसाआड पाणी मिळत असल्याने नागरीकांचे विशेषत: महिलांचे अतोनात हाल होत आहे.

एकीकडे शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांना एक हंडा पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आलेली असतांना दुसरीकडे मात्र याबाबत छोट्या-छोट्या गोष्ठीसाठी रस्त्यावर उतरणारे लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष आणि सामजिक संघटना पाणी टंचाईबाबत मात्र गप्प असल्याचे पाहून या शहराला खरच कोणी वाली उरलं नाही अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या जात आहे.

रेल्वेचे मोठे जंक्शन स्टेशन, धान्य साठवणूक करणारे भारतीय अन्न महामंडळाचे आशिया खंडात क्रमांक दोनचे मानले जाणारे डेपो, रेल्वे ब्रिज बनविण्यासाठी लागणारे गर्डर, नट-बोल्टसह इतर साहित्य तयार करणारा ब्रिटीश कालीन कारखाना, विविध ऑईल कंपन्यांचे इंधन प्रकल्प आदीमुळे देशाच्या नकाशावर मनमाड शहराची आगळीवेगळी ओळख आहे. त्या पाठोपाठ पाणी टंचाईचे माहेर घर म्हणनू देखील या शहराला ओळखले जावू लागले आहे.

पावसाअभावी दरवर्षी उन्हाळ्यात कोरडे पडणारे वागदर्डी, तसेच तळ गाठणार्‍या विहिरी, बंद पडणारे हात पंप, हपसे व बोरवेल, त्यामुळे एक हंडा पाण्यासाठी होणारी अबालवृदांची धडपड असे विदारक चित्र गेल्या 30 ते 35 वर्षापासून येथे पहावयास मिळत होते.

दरवर्षी निर्माण होणार्‍या या पाणीबाणीला कंटाळून सुमारे 10 हजारापेक्षा जास्त नागरीकांनी शहरातून स्थलांतर केले आहे. मंजूर झालेली औद्योगिक वसाहत केवळ पाण्याअभावी सुरु झाली नाही त्यामुळे शहरात बेरोजगारी वाढली.

उच्च शिक्षण घेवून देखील काम मिळत नसल्याचे पाहून हजारो सुशिक्षित तरुण तुटपुंज्या पगारावर इतर शहरात काम करीत आहे. मात्र यंदा चित्र काहीसे वेगळे होते गेल्या वर्षी परतीच्या पावसाने शहर परिसरात जोरदार हजेरी लावली.

त्यामुळे प्रथमच शहरातून वाहणार्‍या रामगुळना व पांझण या दोन्ही नद्यांना महापूर आला होता. वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील अतिवृष्टी झाली होती त्यामुळे धरण केवळ पूर्ण भरलेच नाही तर 35 वर्षांनी मात्र प्रथमच ओवर फ्लो होऊन वाहू लागले. मनमाडचा पाणी पुरवठा हा पालखेड धरणातून मिळणार्‍या पाण्याच्या आवर्तनावर अवलंबून आहे.

एकीकडे पावसाने धरण पूर्ण भरले तर दुसरीकडे पालखेड धरणातून नियमितपणे पाण्याचे आवर्तन देखील मिळत आहे. त्यामुळे शहरात पाणी पुरवठा केल्यानंतर धरणातील पाणी कमी होताच पालिका प्रशासन आवर्तनाचे पाणी पूर्ण क्षमतेने उचलून पुन्हा धरण भरून घेत आहे. त्यामुळे या घडीला देखील धरण सुमारे 70 ते 75 टक्के भरलेले आहे.

सध्या धरणात पाण्याचा मुबलक साठा असल्यामुळे यंदा पाणी टंचाईतून आपली सुटका झाली असल्याचे नागरिकांना वाटत होते. मात्र आजही नागरिकांना 12 ते 15 दिवसाआड पाणी मिळत आहे. धरणात पाणी असले तरी आणि नसले तरी पाणी टंचाई कायम असल्याचे पाहून नागरीकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com