रानभाजी
रानभाजी
नाशिक

पेठ : रानभाज्यांनी वाढवली जेवणाची गोडी

आरोग्यासाठी उपयुक्त

Gokul Pawar

कोहोर : किसन ठाकरे

तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात सध्या रानभाज्यांना बहर आला आहे. दुर्मीळ व औषधी अशा या रानभाज्या ग्रामस्थांच्या आहाराची गोडी वाढू लागल्या आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर गावी परतलेल्या चाकरमान्यांसाठी ही एक पर्वणीच ठरत आहे.

पेठ तालुक्याला निसर्ग सौदर्यांची एक आगळी-वेगळी अशी ओळख आहे. परिसरात समृद्धीने नटलेली जैवविविधता लाभली आहे. रानावनात व घनदाट जंगलांनी व्यापलेल्या येथील डोंगररांगामध्ये अनेक दुर्मीळ वनस्पती आजही आढळून येतात.

या वनस्पतीबरोबरच केवळ पावसाळ्यात उगवणाऱ्या रानभाज्यांही अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जातात. या भाज्या दुर्मीळ व औषधी आणि पौष्टिक असल्याने ग्रामस्थांचा त्यांच्या आहारात समावेश होतो. पावसाळा नुकताच सुरु झाला असून कोहोर, कुंभाळे, जोगमोडी, नाचलोंढी व आसपासच्या डोंगराळ भागात रानभाज्या उगवू लागल्या आहेत.

शेवळा, अंळीब, भोकरी, शेंडवल, तरळी, वाघचौडा, रानकंद, बावटा, मोखा, दिघवडी, रानआळू, फांग, चाईचा मोहोर, वाघाटा, भुईफोड, उळशाचा मोहोर, बोखरीचा मोहोर टेहरा आदी सारख्या गोड, आंबट, खारट चव असणाऱ्या रानभाज्यांचा ग्रामस्थांच्या आहारात समावेश होऊ लागला आहे. पौष्टिक, औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत नसल्याने पावसाळ्यात या भाज्या आरोग्यदृष्ट्या महत्वाच्या ठरत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

भाजी ओळखणे व शोधण्याचे ज्येष्ठांकडून मार्गदर्शन

चवदार, पौष्टिक, औषधी गुणधर्म असणाऱ्या रानभाज्या या परिसरात मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असतात. परंतु एकसारख्या दिसणाऱ्या वनस्पती विषारी देखील असू शकतात. त्यामुळे जुन्या, जाणकार, अनुभवी व्यक्तिकडून या भाज्यांची माहिती घेणे आवश्यक ठरते.तसेच या भाज्यांची बनवण्याची पद्धतही माहिती असणे आवश्यक आहे.

Deshdoot
www.deshdoot.com