विठ्ठल मंदिर, कोटमगाव
विठ्ठल मंदिर, कोटमगाव

येवला : यंदा प्रथमच विठ्ठलाचे कोटमगाव आषाढी एकादशीला बंद

यात्राही रद्द

येवला : प्रती पंढरपूर म्हणून ओळख असणार्‍या तालुक्यातील कोटमगाव बु॥ येथील श्री विठ्ठल मंदिर यंदा करोनामुळे आषाढी एकादशीलाही बंद असून येथील यात्रोत्सव देखील रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे लाखो रुपयाची उलाढाल ठप्प झाली आहे.

तालुक्यातील कोटमगांव बुद्रुकला विठ्ठलाचे कोटमगांव म्हणून ओळखले जाते.

ऐतिहासिक धार्मिक पार्श्‍वभूमीमुळे येथे आषाढी एकादशीला दरवर्षी यात्रोत्सव भरतो तर नाशिक, नगर, औरंगाबाद येथून शेकडो दिंड्यांतून लाखो वारकरी विठ्ठल दर्शनासाठी येथे येत असतात. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र देवस्थान मंदिर बंद असून कोटमगाव येथील विठ्ठल मंदिरही बंदच आहे. आज पहाटे ५ वाजता जगदंबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राऊसाहेब कोटमे व विलास बिलवरे यांनी सपत्नीक विधीवत विठ्ठलाची पुजा केली. नाही म्हणायला परिसरातील काही भाविक दर्शनासाठी येत होते. मात्र येथील स्थानिक प्रशासनाने मंदिर कुलूप बंद करुन भाविकांनी गर्दी करु नये, असे आवाहन केल्याने भाविक अंतराअंतराने बाहेरुनच दर्शन घेताना दिसले.

आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर श्री विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या विश्‍वस्तांची बैठक झाली होती. या बैठकीत आषाढी एकादशी निमित्ताने दर वर्षी भरणारी यात्रा यंदा करोनामुळे रद्द करण्याचा व मंदिरही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी माहितीही विश्‍वस्तांच्या वतीने अध्यक्ष गणपत ढमाले यांनी जाहिर जाहीर केली आहे. भाविकांनी कोटमगाव येथे दर्शनासाठी येण्याचे टाळावे असे आवाहन करून, एकादशीला केवळ मंदिरात विठ्ठलास अभिषेक महापुजा करण्यात येईल, असे अध्यक्ष ढमाले आणि विश्‍वस्तांंनी स्पष्ट केले होते.

येथील यात्रोत्सवात नारळ, पुजा साहित्य, प्रसाद, मिठाई आदींची मोठी रेलचेल असते. यंदा येथे एकही दुकान दिसले नाही. त्यामुळे लाखो रुपयाचे उत्पन्न बुडाले असून ग्रामपंचायतीस मिळणार्‍या उत्पन्नातही यंदा मोठी घट या यात्रोत्सव बंदीमुळे येणार आहे.

Last updated

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com