आम्ही सारे नागवंशीयतर्फे स्त्रीरत्न पुरस्कारांचे वितरण

आम्ही सारे नागवंशीयतर्फे स्त्रीरत्न पुरस्कारांचे वितरण

नाशिक : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही सारे नागवंशीय या सामाजिक संस्थेने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. पुरस्कार वितरण सोहळा फुलेनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आज पार पडला.

या पुरस्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी सुजाता वाघ व प्रमुख पाहुणे म्हणून करूणासागर पगारे, मायाताई खोडवे उपस्थित होत्या. या समारंभात रुपाली बोबडे, डॉ.डी.डी.कुचेकर, वैशालीताई डुंबरे, ज्योती देशमुख, मनीषा गांगोडे, आम्रपाली वाकळे या कर्तृत्ववान महिलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘स्रीरत्न गौरव पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. तर मुलाकरम प्रथेविरोधात बंड करत आत्मबलिदान करणाऱ्या क्रांतीनायिका नांगेलीच्या नावाने ‘क्रांतिनायिका नांगेलीरत्न पुरस्कार’ तृतीयपंथियांचा बुलंद आवाज असलेल्या शमीभा पाटील यांना प्रदान करण्यात आला.

पुरस्कार प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना शमीभा पाटील यांनी भारतीय महिलांच्या व्यथा, वेदनांची कारणमीमांसा विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केली. पुरुषप्रधानता, मनुस्मृती आणि अनिष्ट चालीरितींमुळे भारतीय महिलांना हजारो वर्षांपासून पिढण भोगावे लागलेले आहे. परंतु भारतीय संविधानाने महिलांना समानतेचे अधिकार दिलेले असल्यामुळे आजची नारी शक्ती स्वतंत्र विचारांची आणि स्वावलंबी झालेली आहे.

दुसऱ्या सत्रात जेष्ठ साहित्यिक प्रा.गंगाधर अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन संपन्न झाले. संमेलनात निमंत्रित कवी अँड.अशोक बनसोडे, काशीनाथ वेलदोडे, विद्रोही कवी बुद्धभूषण साळवे, प्रदीप जाधव, योगेश वाघ, नवनाथ काळे, जयेश मोरे, राहुल लोखंडे, दीपक गांगुर्डे, सागर पगारे सहभागी होते. यावेळी कविसंमेलनाचे अध्यक्ष प्रा.गंगाधर अहिरे म्हणाले की, कवी हा समाजाचा पहिला जागल्या आहे त्याने समाजातील व्यंग, कृप्रथा, अंधश्रद्धा, सनातन मानसिकता आणि महिलांचे होणारे शोषण या विरोधात मुक्तपणे पान्हा न चोरता कवितेच्या माध्यमातून व्यक्त झालं पाहिजे ती कवीची सामाजिक जबाबदारी आहे. या कविसंमेलनात प्रा.गंगाधर अहिरेंनी महिलांवरील अत्याचाराच्या निमित्ताने ‘ कळप ‘ नावाचीएक रचना सादर केली. प्रगतिशील समाजात आजही मासिक पाळीला विटाळ समजला जातो यावर प्रकाश टाकताना प्रसिद्ध विद्रोही कवी बुद्धभूषण साळवे यांनी ‘ स्ने. ब.थो ‘ ही आपली विद्रोही कविता सादर केली

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी गायकवाड , किरण निकम यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष संविधान गायकवाड यांनी केले. जाती-धर्माचा नव्हे तर महापुरूषांचा विचार आणि भारतीयत्वाची कृतीशील भावना जनमानसांत पोहोचविण्यासाठी आम्ही सारे नागवंशीय बहुउद्देशिय संस्थेची स्थापना झाली. कर्तृत्ववान महिलांचा सन्मान हा त्यांना लढण्यास बळ मिळावे व इतरांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी , व्यवस्थेने‌ लादलेल्या गुलामीची जाणीव व्हावी आणि स्त्री जीवनातील भारतीय संविधानाचे महत्व इ. स्वरुपाचा कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे ते यावेळी म्हणाले. या वेळी विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी, मुकेश पगारे, शिवदास दोंदे, प्रफुल्ल वाघ, तुषार मोरे, जया काकडे, कोमल पगारे, किशोर मोहिते व संस्थेच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com