नाशकात साजरा होणार 10 वा ‘भारतीय कला दिन’
नाशिक

नाशकात साजरा होणार 10 वा ‘भारतीय कला दिन’

Gokul Pawar

नाशिक । पहिल्या शतकातील भारताचा आद्य नाटककार कवी, संगीतकार, दिग्दर्शक, एकतारीवर आपल्या विचारांचा प्रचार, प्रसार करणारा महान प्रबोधनकार गायक अश्वघोष याने बुद्धचरित, सौंदरानंद ही जगप्रसिद्ध महाकाव्यं, सूत्रालंकार कथा संग्रह, राष्ट्रपाल, उर्वशीवियोग, सारिपुत्र प्रकरण सारखी नाटकं आणि विषमतेवर परखड भाष्य करणार्‍या वज्रसूची नावाच्या ग्रंथाचे लेखन केले.

भारतात अनेक कला अस्तित्वात असल्या, तरी त्या कलेतील कुठल्याच कलाकाराने कधीही ‘भारतीय कला दिन’ साजरा केला नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी बोधी नाट्य परिषदने नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच 1 जानेवारी हा अश्वघोषाचा जन्म दिन मानून ‘भारतीय कलादिन’ साजरा करण्यास सुरूवात केली व कलाक्षेत्रात एक नवी परंपरा रुजवली. दिनांक 1 जानेवारी 2020, बुधवारी सायंकाळी 5.30 वाजता प.सा. नाटयगृहाच्या आवारातील कै. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात साजरा होणारा हा 10 वा भारतीय कलादिन आहे.

या निमित्ताने नाटककार अशोक हंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘आद्य नाटककार अश्वघोष ते बोधी रंगभूमी’ या विषयावर परिसंवाद होईल. या परिसंवादात पाली भाषा व सौदर्यशास्त्राचे अभ्यासक देवेंद्र उबाळे आणि प्रसिद्ध नाटयलेखक व दिग्दर्शक मुकुंद कुलकर्णी हे वक्ते सहभागी होणार आहेत.

या प्रसंगी 99व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी ‘भारतीय कला दिन कां ?’ याबद्दल भूमिका मांडतील आणि सुरेश मेश्राम हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील. तेव्हा या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन बोधी नाट्य परिषदेचे समन्वयक भगवान हिरे यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com