नाशिक |Nashik (प्रतिनिधी)

उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखात्यारित येणाऱ्या आठ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांसाठीच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आला नसून, शैक्षणिक वर्ष २०२०-२१च्या सीईटींसाठी असणारा अभ्यासक्रम यंदाच्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी कायम ठेवला आहे. विद्यार्थ्यांना फटका बसू नये, यासाठी अभ्यासक्रम जैसे-थे ठेवण्याचा निर्णय उच्चशिक्षण संचालनालयाने घेतल्याची शक्यता आहे.

उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले असून, अभ्यासक्रमांची माहिती राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाला (सीईटी सेल) कळवण्यात आली आहे. विद्यार्थी व पालकांच्या माहितीसाठी या सविस्तर अभ्यासक्रमांची माहिती सीईटी सेलच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे.

या सीईटींमध्ये विधी तीन वर्षे, विधी पाच वर्षे, बीएड, बीपीएड, बीए बीएड/ बीएस्सी बीएड, एमएड, एमपीएड, बीएड-एमड अशा सीईटी परीक्षा आहेत. या परीक्षा २०२०-२१ मध्ये असलेल्या अभ्यासक्रमांनुसार पार पडणार असल्याची माहिती डॉ. माने यांनी दिली आहे.

'सीईटी सेल'कडून या अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा घेण्यात येतात; तसेच त्यांच्या प्रवेशप्रक्रियाही राबविण्यात येतात. त्यामुळे अभ्यासक्रम आणि सीईटी परीक्षांबाबत अधिक माहिती 'सीईटी सेल'च्या वेबसाइटवर मिळेल.