लासलगाव बाह्यवळण रस्ता भूसंपादन रखडले

तेरा वर्षांनंतरही मार्ग पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत
लासलगाव बाह्यवळण रस्ता भूसंपादन रखडले

लासलगाव । वार्ताहर | Lasalgoan

लासलगावसह (Lasalgaon) परिसर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या उड्डाणपूल व चार कि.मी. बाह्य वळण रस्त्याचे काम (Road work) गेल्या तेरा वर्षानंतरही पूर्ण होऊ शकले नाही. शेकडो कि.मी. समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊन शेतकर्‍यांना मोबदला देखील मिळाला....

मात्र येथील अवघ्या चार कि.मी. रस्त्याच्या भूसंपादन झालेल्या जमिनीचा मोबदला अद्याप शेतकर्‍यांना (Farmers) मिळाला नसल्याने आता या बाह्य वळण रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार अन् प्रत्यक्ष या रस्त्याने रहदारी केव्हा सुरू होणार असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.

लासलगाव शहरातून गेलेल्या विंचूर-प्रकाशा रस्त्यावर वाढती रहदारी विचारात घेता व येथील कांद्याची प्रमुख बाजारपेठ असल्याने शहरातून जाणार्‍या या रस्त्यावर वाहनांची होणारी कोंडी नित्याची झाली होती.

परिणामी त्यावर मार्ग काढण्यासाठी सन 2008 मध्ये पालकमंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांच्या प्रयत्नाने लासलगाव शहराच्या बाहेरून रस्त्याची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी रेल्वे लाईनवर उड्डाणपूल बनविण्यात आला. बाह्य वळण रस्त्यासाठी तीन टप्प्यात भूसंपादन करण्याचे नियोजन झाले.

पहिल्या टप्प्याचे भूसंपादन दहा वर्षांपूर्वी झाले तर दुसर्‍या टप्प्याच्या भूसंपादनाला तीन ते चार वर्षाचा कालावधी उलटला असतांनाही अद्यापपर्यंत त्या शेतकर्‍यांना पूर्ण भरपाईची रक्कम मिळाली नाही. साहजिकच तिसर्‍या टप्प्याचे भूसंपादन रखडले आहे.

लासलगावसह परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या बाह्य वळण रस्त्याचे काम लवकर मार्गी लागणे गरजेचे आहे. त्यासाठी महामार्गासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकर्‍यांना देणेही गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक-पुणे लोहमार्गाचे देखील शासकीय सोपस्कार पूर्ण होऊन लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

मग या रस्त्यासाठी घोडे कुठे अडले. साहजिकच लासलगावचा बाह्य वळण रस्ता हा दिवास्वप्न ठरतो की काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे. या भूसंपादनाअभावी अनेक शेतकर्‍यांचे वाटप पत्र, व्यापार, अंतर्गत रस्ते, खरेदी-विक्री, जमिनी बिनशेती करणे आदी कामे रखडली आहे.

संपादित होणार्‍या जमिनीत गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने मोजणीचे दगड रोवून पडले आहेत. त्यामुळे या शेतकर्‍यांना जमिनही कसता येत नाही आणि रस्ताही होत नाही.

दुसरीकडे खा.भारती पवार (MP Bharti Pawar) यांच्या काही महिन्यांच्या प्रयत्नाने लासलगाव-टाकळी भुयारी मार्ग पूर्णत्वाच्या मार्गावर आहे, तर हा बाह्य वळण रस्त्याचे काम लवकर मार्गी लागावे यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, शेतकरी, व्यापारी व ग्रामस्थांनी वेळोवेळी भुजबळांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला.

ना. भुजबळांनी देखील अधिकार्‍यांना कामाबाबतचे आदेश दिले. परंतु सुस्त यंत्रणेने कधी करोना, कधी निवडणूक, कधी मोजणी, कधी मूल्यांकन, कधी शासकीय मंजुरी अशी कारणे देत दुर्लक्ष केल्याने लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे भिजत घोंगडे पडले आहे. त्यामुळे आता मतदार संघाचे लोकप्रतिनिधी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीच याप्रश्नी लक्ष घालून या रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com