लासलगाव बाजार समिती बंदचा निर्णय शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक

सोशल डिस्टंसिंगचा वापर करून लिलाव पूर्ववत सुरू ठेवावे ; शेतकऱ्यांची मागणी
लासलगाव बाजार समिती बंदचा निर्णय शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक

नाशिक । प्रतिनिधी

करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव आणि व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार स्थानिक प्रशासनाच्या निर्णयामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला कांद्याचे लिलाव सोमवारी ( दि.१९) बंद ठेवावे लागले.मात्र, हा निर्णय म्हणजे कांदा उत्पादकांवर अन्याय करणारा असून सोशल डिस्टंसिंग चा वापर करून कांद्याचे लिलाव सुरू ठेवावे अशी मागणी कांदा उत्पादकांनी केली आहे...

लासलगाव कांदा बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वाधिक कांदा खरेदी-विक्री करणारी बाजार समिती आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाच्या निर्णयानुसार लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला आपले व्यवहार बंद ठेवावे लागले. मात्र जिल्ह्यातील इतर बाजार समिती मधील कांदा व्यवहार सोमवारी सुरू होते. लासलगाव बाजार समिती बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर काही अंशी कोसळले. यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यवहार बंद ठेवले असले तरी शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कांदा उत्पादक शेतकऱ्यांची यावर्षी कांदा बियाणामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे.

उन्हाळ कांद्याचे बियाणे म्हणून लेट खरीप (रांगडा) कांद्याचे बियाणे व्यापाऱ्यांकडून व दुकानदारांकडून शेतकऱ्यांना विक्री केले गेलेले आहे. सध्या काढणीस आलेला कांदा हा उन्हाळ कांदा नसून लेट खरीप कांदा आहे. लेट वास्तविक पाहता लेट खरीप कांदा हा मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत निघतो.

मात्र, बियानांमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली असल्यामुळे या वर्षी लेट खरीप कांदा एप्रिल महिना संपत आला असूनही शेतकऱ्यांना काढावा लागत आहे. त्यातच लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा खरेदी बंद असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा दुहेरी फटका बसला आहे. लासलगाव बाजार समिती स्थानिक प्रशासनाच्या सूचनेवरून कांदा मार्केट बंद ठेवले असून सोशल डिस्टंसिंग ठेवून कांद्याची खरेदी करणे गरजेचे होते.

कारण सध्या काढणीस आलेला लेट खरीप कांदा हा साठवणूक करण्या योग्य नसल्यामुळे तो विक्रीच करावा लागतो.मात्र बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवू नये, असे शासनाचे निर्देश आहेत. तसेच पणन महामंडळाचेही कृषी उत्पन्न बाजार समित्या या बंद ठेवू नये असे निर्देश असतानाही लासलगाव बाजार समितीला स्थानिक प्रशासनामुळे आपले व्यवहार बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

लासलगाव बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या विंचूर उपबाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू होते.

मात्र, लासलगाव स्थानिक प्रशासनामुळे विंचुर उपबाजार समितीही बंद ठेवण्याची वेळ आली आहे.लॉकडाऊन च्या नावाखाली अशाप्रकारे व्यवहार बंद ठेवून शेतकऱ्यांचे नुकसान करू नये अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

कडक लॉकडाऊन करावा

लॉकडाऊन जर करायचेच असेल तर मेडिकल वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवावे. काही दुकाने चालू आहे काही दुकाने बंद असे करण्यापेक्षा सरसकट पंधरा दिवसांचा कडक लोकडाऊन करावा मगच खऱ्या अर्थाने लोकांचा फायदा होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सोशल डिस्टंसिंग पुरेपूर वापर करावा

लासलगाव बाजार समिती स्थानिक प्रशासन व व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार आठ दिवस बंद राहणार आहे.मात्र ,अशा प्रकारे कांदा लिलाव बंद ठेवणे अयोग्य असून हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. वास्तविक पाहता कांद्याचे लिलाव सुरू ठेवून सोशल डिस्टंसिंग पुरेपूर वापर बाजार समितीने करावा,अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी लासलगाव बाजार समितीचे सभापती व सचिव यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com