नाशकात चार्जिंग बाईक्सचा खप का वाढला ? जाणून घ्या

नाशकात चार्जिंग बाईक्सचा खप का वाढला ? जाणून घ्या

नाशिक | अनिरुद्ध जोशी

कोरोना व लॉकडाऊनमुळे आधीच नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच देशात पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे दुचाकीचालकांवर आर्थिक ताण वाढला आहे. एकीकडे इंधनदर वाढत असताना यावर मात करण्यासाठी नाशिककरांनी मात्र आता यावरदेखील पर्याय निवडला आहे...

शहरातील रस्त्यांवर चार्जिंगवर चालणाऱ्या दुचाकी धावू लागल्या आहेत. पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकींच्या तुलनेने इलेक्ट्रीक दुचाकींचा खर्च कमी आहे. इलेक्ट्रिक दुचाकींसाठी बाजारात मुबलक पर्याय उपलब्ध असल्याने नागरिकदेखील सुखावले आहेत. परिणामी नागरिकांचा कल इलेक्ट्रिक दुचाकींकडे वाढत चालल्याचे दिसून येत आहे.

दुचाकी खरेदी करायचा विचार कुणी करत असेल तर हे बाईकस्वार इकोफ्रेंडली दुचाकीबाबत गुणगाण गातात. इलेक्ट्रिक दुचाकीचे अनेक चांगले फायदे आहेत. पेट्रोलवरील दुचाकीच्या तुलनेत इलेक्ट्रिक दुचाकीचा दैनंदिन खर्च व मेंटेनन्सचा खर्च अत्यंत कमी असतो.

तसेच इलेक्ट्रिक दुचाकी वजनाने हलक्या असल्याने त्या मुली आणि ज्येष्ठ नागरिकदेखील सहजरीत्या चालवू शकतात. इलेक्ट्रिक दुचाकी एकावेळी चार्ज करण्यासाठी साधारणपणे तीन युनिट वीज खाते. एकदा चार्ज केलेली दुचाकी साधरणतः १०० ते १५० किमी धावते.

एका युनिटला दहा रुपये खर्च पकडला तरी इलेक्ट्रिक दुचाकी तीस रुपयांच्या खर्चात १५० किमी धावते म्हणजेच प्रति किमी ५० पैशापेक्षा कमी प्रवासखर्च होतो. आजचे जग प्रदूषणाशी लढत आहे. इलेक्ट्रिक दुचाकी प्रदुषणमुक्त असल्याने पर्यावरणाची हानी होत नाही.

इलेक्ट्रिक दुचाकी आपण कधीही, कोठेही चार्ज करू शकतो, त्यामुळे कुठलाही त्रास होत नाही. दुचाकीची बॅटरी घरीच चार्ज करता येत असल्याने ही वाहने सोयीस्कर ठरतात. पेट्रोल-डिझेलच्या दुचाकींपेक्षा इलेक्ट्रिक वाहने कमी त्रासदायक ठरतात.

भारत सरकारने फेम-२ योजनेत बदल करुन इलेक्ट्रिक वाहनांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये वाढ केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता प्रति kwh १५ हजार रुपये अनुदान करण्यात आले आहे.

त्यामुळे देशात इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीदेखील स्वस्त होणार आहेत. तसेच इलेक्ट्रिक बाईकला जास्त देखभाल करण्याची गरज नाही. पेट्रोल दुचाकींसाठी पाच-सहा वर्षात जेवढे पेट्रोलसाठी पैसे लागतात. तेवढ्या किंमतीत ईलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करता येते. यामुळेच नागरिकांचा इलेक्ट्रिक मोटारसायकलींकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.

आरटीओ परवान्याची आवश्यकता नाही

२५० वॅटपेक्षा कमी क्षमतेची मोटार असलेल्या ई-वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नोंदणीची गरज नसते आणि वाहन चालविण्याच्या परवानादेखील लागत नाही.

वजनाने हलकी

या दुचाकी वजनाने हलकी असतात. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती, महिला आणि मुले या दुचाकीचा वापर सहजरित्या करू शकतात. दुचाकीचे वजन पेलवत नाही म्हणून अनेकजण दुचाकी घेण्यासाठी पसंती दर्शवत नाहीत. त्यांना इलेक्ट्रिक दुचाकी हा चांगला पर्याय आहे.

इलेक्ट्रिक वाहनांचे फायदे

  • प्रदूषणमुक्त

  • कमी देखभाल

  • कर बचत

  • कमी खर्च

सध्या इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पेट्रोलचे दर गगनाला भिडल्याने ग्राहकांनी इलेक्टिक दुचाकी खरेदी करण्याला पसंती मिळत आहे. पेट्रोलच्या तुलनेत इलेक्ट्रिक दुचाकींचा खर्च अत्यंत कमी आहे. तसेच या दुचाकींमुळे हवा आणि ध्वनी प्रदूषण होत नसल्याने ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक दुचाकींकडे वाढत चालला आहे.

जयंत जानमाळी, जॉय बाईक्स, नाशिक

पेट्रोलच्या तुलनेत इलेक्ट्रिक दुचाकी खूप परवडत आहे. इ- दुचाकीबद्दल माझा चांगला अनुभव आहे. घरीच चार्गिंग करता येत असल्याने कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही. साधारणतः साडेतीन ते चार तासात संपूर्ण बॅटरी चार्ज होते. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी प्रत्येकाने इलेक्ट्रिक दुचाकींचाच वापर करणे गरजेचे आहे.

रोहित कुलकर्णी, इलेक्ट्रिक दुचाकी ग्राहक, नाशिक.

गेल्या चार वर्षांपासून आम्ही इलेक्ट्रिक दुचाकींचा व्यवसाय करीत आहोत. नाशकात आजवर अनेकांनी दुचाकींचा व्यवसाय केला. त्यातील काही शोरूम आज बंद पडले आहेत. अहोरात्र मेहनत केल्यामुळे आम्ही आजही या क्षेत्रात टिकून आहोत. ग्राहकांना चांगली सेवा दिल्याने आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांना इलेक्ट्रिक दुचाकीचे महत्व समजले आहे. त्यामुळे ते इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करण्यावर भर देत आहेत.

सुहास देशमुख, हिरो इलेक्ट्रिक, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com