सिन्नर तालुक्यात डेंग्यू, चिकनगुनियाचे थैमान

सिन्नर तालुक्यात डेंग्यू, चिकनगुनियाचे थैमान

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

करोनाची दुसरी लाट (Corona second wave) अजून पूर्णपणे ओसरली नसतानाच सिन्नर तालुक्यात (Sinnar taluka) गेल्या पंधरा वीस दिवसांपासून डेंग्यू व चिकनगुनिया (Dengue and Chikungunya) सदृश्य आजाराने हात पाय पसरले आहेत...

शहरातील जवळपास सर्वच खासगी रुग्णालयांमध्ये (Private hospital) डेंग्यू (Dengue) व चिकनगुनिया (Chikungunya) आजाराचे रुग्ण उपचारासाठी भरती होत असल्याने चिंता वाढली आहे.

थोडाफार पाऊस होताच ताप येणे, डोके दुखणे, अशक्तपणा येणे, मळमळ होणे, हात-पाय दुखणे यासारखी लक्षणे असलेली रुग्णांची संख्या वाढली आहे.

करोनाशी (Corona) साधर्म्य असणार्‍या तापासारख्या लक्षणामुळे सर्वसामान्य खासगी रुग्णालयांकडे धाव घेत आहेत. मात्र, तेथे रक्ताची तपासणी केल्यानंतर डेंग्यू व चिकन गुनिया सदृष्य आजाराचे निदान होत आहे.

गेल्या महिनाभरापासून या आजाराने डोके वर काढले असले तरी पंधरा-वीस दिवसांपासून जवळपास सर्वच खासगी रुग्णालयांमध्ये या आजारांचे रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.

कोरोनाच्या तुलनेत हा आजार संसर्गजन्य नसला तरी आधीच आर्थिक कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्य सिन्नरकरांची आर्थिक गणित बिघडवण्याचे काम करतो आहे.

प्लेटलेट्स कमी होणे, बी.पी. कमी होणे, पोटात-पित्ताशयात पाणी होणे, शरीरात रक्तस्राव होणे यासारखे प्रकार झाल्याने अनेक रुग्ण गंभीर बनतात. अशा रुग्णांची संख्या महिनाभरापासून वाढत असल्याचे दिसून येत आहे.

स्वच्छ पाण्यातील डासांमुळे डेंग्यूसारखा आजार होतो. त्यात प्लेटलेट्स कमी होणे, पोटात पित्ताशयात पाणी होणे, बी.पी. कमी होणे यासारखे प्रकार या आजारात होतात. पहिल्या पाच सात दिवसात येणारा ताप कमी झाल्यानंतर या आजाराला आटोक्यात आणणे शक्य होते. त्यात काही रुग्णांना गंभीर त्रास होऊ शकतो. मात्र, या आजारात दगावण्याचे प्रमाण कमी असते.

- डॉ. श्रीकांत मुत्रक

पावसाळ्यात अनेक रस्त्यांवर उपनगरांमध्ये पाण्याचे डबके साचले आहेत. त्यातून डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे डेंग्यूसह अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. नगरपरिषदेने खड्डे बुजविण्याबरोबरच प्रतिबंधक औषधांची तातडीने फवारणी करणे गरजेचे आहे.

- राहूल बलक, सामाजिक कार्यकर्ते

दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर पाण्याची डबकी वाढतात. गच्चीवर पाणी साचल्याने डासांच्या अळ्या वाढतात. त्यामुळे डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण वाढतात. यंदाही असे रुग्ण वाढले आहेत. शहरातील ज्या भागात रुग्ण वाढले आहेत, त्या भागांची यादी नगरपरिषदेला पाठवली असून त्या भागात तातडीने डास प्रतिबंधक फवारणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आठ दिवसांपासून फवारणी सुरू झाली आहे.

- डॉ. प्रशांत खैरनार, वैद्यकीय अधिकारी, सिन्नर न.प. दवाखाना

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com